
अमरावती, 22 सप्टेंबर (हिं.स.) ।मेळघाटातील दुर्गम आणि आदिवासीबहुल भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेला जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून १२ अत्याधुनिक रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहेत. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे विशेष पुढाकारातून उपलब्ध झालेल्या या रुग्णवाहिकांमुळे मेळघाटातील रुग्णसेवेला मोठे बळ मिळणार असून, गंभीर रुग्णांना वेळेवर उपचार उपलब्ध होण्यासाठी मदत होणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण परिसे यांनी नव्याने प्राप्त झालेल्या रुग्णवाहिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. या रुग्णवाहिकांमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीने उपचार केंद्रात पोहोचविणे अधिक सुलभ होणार आहे. मेळघाट हा डोंगराळ आणि भौगोलिकदृष्ट्या अतिदुर्गम भाग मानला जातो. अनेक गावांपर्यंत पोहोचण्यासाठी खडतर रस्त्यांचा सामना करावा लागतो. विशेषतः पावसाळ्यात वाहतुकीच्या समस्या निर्माण होत असल्याने रूणांना वेळेत वैद्यकीय सेवा मिळण्यात अडचणी येतात. रुग्णवाहिकांची अपूरी संख्या आणि मोठे अंतर बामुळे गंभीर रुग्ण, गर्भवती महिला, अपघातग्रस्त तसेच बालकांना वेळेवर उपचारासाठी हलविणे मोठे आव्हान ठरत होते.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेला मिळालेल्या नवीन रुग्णवाहिका आरोग्य व्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. मेळघाटातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये आणि दुर्गम भागातील आरोग्य संस्थांना या रुग्णवाहिका प्राधान्याने उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यास मदत होईल, तसेच आरोग्य यंत्रणेची कार्यक्षमताही वाढणार आहे. आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने उचललेले हे पाऊल मेळघाटातील दिलासादायक ठरणार असून, दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्थेला न बळ मिळणार आहे. नवीन रुग्णवाहिकांमुळे मेळघाटासह दुर्गम भागातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक गतिमान होईल. गंभीर रुग्णांना तातडीने उच्चस्तरीय उपचार केंद्रांपर्यंत पोहोचविणे शक्य होणार असून, याचा बेट फायदा सर्वसामान्य नागरिकांना होईल. ---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी