
पुणे, 22 सप्टेंबर (हिं.स.)। मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यास परवानगी नाकारण्यात आलेल्या सुमारे १५० गणेश मंडळांना पुणे पोलिसांनी दिलासा दिला आहे. करोनानंतर मागील दोन-तीन वर्षांपासून तात्पुरत्या स्वरूपात मुख्य मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांना यंदा विशेष बाब म्हणून पुन्हा सहभागी होता येणार आहे.
यंदा महोत्सवी वर्ष असलेल्या गणेश मंडळांनाही मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याची संधी देण्यात येणार आहे. मात्र, पुढील वर्षापासून गणेश मंडळांच्या सहभागाबाबत स्वतंत्र धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होता येणार नसल्याच्या नोटिसा पोलिसांनी सुमारे १५० मंडळांना बजावल्या होत्या. या निर्णयानंतर संबंधित मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली.
या बैठकीत पोलिस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, संजय बनसोडे यांच्यासह विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. चर्चेनंतर मागील काही वर्षांत तात्पुरत्या स्वरूपात सहभागी झालेल्या मंडळांना यंदा विशेष बाब म्हणून मिरवणुकीत सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु