
आदिलाबाद, 22 सप्टेंबर (हिं.स.) । तेलंगणाच्या आदिलाबाद जिल्ह्यातील राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (रिम्स) रुग्णालयाच्या स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिटमध्ये (एसएनसीयू) सोमवारी रात्री उशिरा लागलेल्या आगीत 2 नवजात बालकांचा मृत्यू झाला. आगीच्या वेळी वॉर्डमध्ये दाखल असलेल्या अन्य 25 बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश मिळाले. ही घटना रात्री सुमारे 11.50 वाजता घडली.
याबाबत आदिलाबादच्या जिल्हा वैद्यकीय व आरोग्य अधिकारी (डीएचएमओ) डॉ. साधना यांनी दिलेल्या माहितीनुसार, एसएनसीयूच्या रिसेप्शन परिसरातील एअर-कंडिशनरला आग लागल्याने दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. एसएनसीयूमध्ये 2 विभाग असून त्यापैकी एका विभागात 11, तर दुसऱ्या विभागात 13 बेड आहेत. युनिटसमोरील ‘कांगारू मदर केअर’ विभागात 4 बेड आहेत. हे विभाग बंदिस्त असल्याने आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूर युनिटमध्ये साचला.
आगीची माहिती मिळताच रुग्णांच्या नातेवाईकांनी काचेच्या खिडक्या फोडून धूर बाहेर जाण्यासाठी मार्ग केला. त्यांनी बाधित भागातील नवजात बालकांना बाहेर काढण्यातही मदत केली. त्यानंतर वाचवण्यात आलेल्या बालकांना पुढील उपचारांसाठी जवळच्या खासगी रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले.या घटनेत मृत्यूमुखी पडलेली दोन्ही बालके मुदतपूर्व जन्मलेली होती. त्यांचे वय अनुक्रमे 4 आणि 5 दिवस होते. त्यापैकी एका बालकाचा आगीच्या घटनेनंतर लगेच मृत्यू झाला, तर दुसऱ्या बालकाने सुमारे 4 तासांनंतर उपचारादरम्यान प्राण गमावले, अशी माहिती डॉ. साधना यांनी दिली.आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि आग नियंत्रणात आणली. पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून तपास सुरू केला आहे.
मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करून मृत बालकांच्या कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त केली. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अन्य बालकांना आवश्यक वैद्यकीय उपचार मिळावेत आणि त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवावे, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
मुख्यमंत्र्यांनी घटनेची चौकशी करण्याचे आदेश देत आगीचे कारण आणि दुर्घटनेमागील परिस्थिती याबाबत अहवाल सादर करण्यास सांगितले. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी राज्यातील रुग्णालयांमधील अग्निसुरक्षा आणि इतर सुरक्षा उपाय अधिक बळकट करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
सर्वतोपरी मदतीची ग्वाही
राज्याचे आरोग्यमंत्री सी. दामोदर राजा नरसिंहा यांनीही दोन नवजात बालकांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले. शोकाकुल कुटुंबीयांना सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. घटनेच्या वेळी वॉर्डमध्ये असलेल्या अन्य बालकांची प्रकृती स्थिर असून, सध्या कोणत्याही बालकाला गुंतागुंत नसल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली.आगीच्या कारणाचा तातडीने तपास करून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी