
यवतमाळ, 22 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्ह्यात जुलै महिन्यात विविध विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात तब्बल ५२ विद्यार्थी शाळाबाह्य आढळून आले आहे. या विद्यार्थ्यांना नजीकच्या शाळेत प्रवेश देण्यात आला आहे. वेगवेगळ्या कारणामुळे दरवर्षी अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. बऱ्याच विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती, तर काही पालक कामाच्या शोधात इतरत्र जातात. त्यांचे पाल्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होते. असा एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये, याकरिता शासनाने शाळाबाह्य तसेच स्थलांतरितांचे सर्वेक्षण करावे, असे निर्देश दिले आहे.
दरवर्षी शैक्षणिक वर्षाला सुरवात झाल्यानंतर हे सर्वेक्षण करण्यात येते. यंदा शिक्षण, समाज कल्याण, महसूल, कामगार, महिला व बालकल्याण, आदिवासी विभाग आदी विभागाच्या माध्यमातून जिल्ह्याभरात जुलै महिन्यात सर्वेक्षण करण्यात आले. प्रामुख्याने सर्व खेडी, वाड्या, वस्त्या, तांडे, पाडे, शेतमळे, जंगलात वास्तव्य करणाऱ्यांसह बसस्थानक, रेल्वेस्थानक, सिग्नल, हॉटेल, विट्टभट्टी, खानावळी, सार्वजनिक ठिकाणे, बाजार तळा, दगडखाणी, साखर कारखाने आदी ठिकाणी प्रत्यक्ष पोहचून सर्वेक्षण करण्यात आले. आजपर्यंत शाळेत न गेलेले तब्बल ३९ विद्यार्थी आढळून आले आहे. तसेच शाळेमध्ये प्रवेश घेतलेले, परंतु सतत गैरहजर असणारे १३, असे मिळून एकूण ५२ शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षणात आढळून आले आहे. आढळून आलेल्या ५२ विद्यार्थ्यांना नजीकच्या शाळेत प्रवेश देण्यात आला आहे.
१४६ विद्यार्थ्यांना दिले हमीकार्ड
जिल्ह्यांमधून इतर ठिकाणी तसेच दुसऱ्या राज्यांमध्ये अनेक पालक कामासाठी गेले आहेत. त्यांच्यासोबत तब्बल १४६ विद्यार्थी गेले आहे. अशा विद्यार्थ्यांना शिक्षण हमीकार्ड देण्यात आले आहे. तर त्यातील काही विद्यार्थी टीसी घेऊन इतर ठिकाणी शिक्षणाकरिता गेलेले आहे. विशेष म्हणजे इतर ठिकाणाहून जिल्ह्यात ११० विद्यार्थी आलेले आहेत. या विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार नजीकच्या शाळेत दाखल करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी