
छत्रपती संभाजीनगर, 22 सप्टेंबर (हिं.स.)। राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय भरती परीक्षा टास्क फोर्सने छत्रपती संभाजीनगर विभागातील २४७ विद्यार्थ्यांशी स्मार्ट सिटी कार्यालयात थेट संवाद साधला. यावेळी परीक्षा वेळापत्रक, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका तपासणी, पदसंख्या, परीक्षा केंद्रे, निकाल, नियुक्ती, प्रतीक्षा यादी व तक्रार निवारण यासह विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी सूचना मांडल्या.
टास्क फोर्सच्या अध्यक्ष तथा सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस समितीचे सदस्य तथा पोलीस महासंचालक सदानंद दाते, सदस्य सचिव तथा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. एन. रामास्वामी, सदस्य तथा नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे समितीचे सदस्य तथा संघ लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य एअर मार्शल अजित शंकरराव भोसले आणि सदस्य तथा आयआयटी मुंबईचे प्राध्यापक श्यामप्रसाद करगड्डे सहभागी झाले. या संवाद कार्यक्रमात सातही जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयांतून विद्यार्थी ऑनलाइन सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांनी विविध गटात भेटी देत अनेक सूचना केल्या. टास्क फोर्स सदस्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सूचनाला गांभीर्याने ऐकून घेतले. विद्यार्थ्यांनी परीक्षांचे वार्षिक वेळापत्रक निश्चित करून त्याचे पालन करावे, परीक्षा पद्धती व अभ्यासक्रमात वारंवार बदल करू नयेत आणि बदल आवश्यक असल्यास पुरेशी पूर्वसूचना द्यावी, अशी मागणी केली. विविध संवर्गांतील रिक्त पदांची संख्या वेळेत जाहीर करून उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, जलसंपदा, वैद्यकीय व दंत वैद्यकीय अधिकारी यांसह अन्य पदांची नियमित भरती करावी, अशी सूचनाही करण्यात आली. एकाच उमेदवाराची अनेक पदांवर निवड झाल्यास पदनिवड व पदाचा त्याग (ऑप्टिंग आऊट) याबाबत स्पष्ट धोरण असावे. तसेच रिक्त पदांवर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis