
छत्रपती संभाजीनगर, 22 सप्टेंबर (हिं.स.)। शिवसेना आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थितीत एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची धाराशिव-कळंब तालुक्यांची संयुक्त आढावा बैठक संपन्न झाली.
बैठकीत धाराशिव-कळंब तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य सुविधांमधील त्रुटी, डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता, औषधसाठा, वैद्यकीय उपकरणे, रुग्णवाहिका, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे तसेच शासकीय रुग्णालयांमधील विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी आरोग्यसेवा ही नागरिकांची मूलभूत गरज असून, आरोग्य सुविधांच्या अभावामुळे कोणत्याही रुग्णाला उपचारापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी आरोग्य यंत्रणेने अधिक जबाबदारीने आणि संवेदनशीलतेने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
बैठकीत पुढीलप्रमाणे निर्देश देण्यात आले..
ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये डॉक्टर, परिचारिका आणि आवश्यक आरोग्य कर्मचाऱ्यांची उपलब्धता सुनिश्चित करावी..
रुग्णालयांमध्ये आवश्यक औषधांचा पुरेसा व नियमित साठा उपलब्ध ठेवावा. औषधांअभावी रुग्णांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी..
बंद अथवा नादुरुस्त असलेली वैद्यकीय उपकरणे तातडीने दुरुस्त करून सेवेत कार्यान्वित करावीत..
रुग्णवाहिका उपलब्धतेतील अडचणी दूर करून आपत्कालीन आरोग्यसेवा अधिक सक्षम व तत्पर करावी.
ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात..
गर्भवती महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजारांच्या रुग्णांसाठी विशेष व प्रभावी आरोग्यसेवा उपलब्ध करून द्यावी..
शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचतो की नाही, याची नियमित प्रशासकीय तपासणी करावी..
आरोग्य केंद्रांमधील स्वच्छता, पिण्याचे पाणी, वीज आणि इतर मूलभूत सुविधांमध्ये कोणतीही तडजोड करू नये..
नागरिकांना उपचारासाठी अनावश्यकपणे दुसऱ्या रुग्णालयात पाठवावे लागू नये, यासाठी स्थानिक पातळीवरील आरोग्य यंत्रणा सक्षम करावी..
या सर्व बाबींवर कागदोपत्री कार्यवाही न करता कालबद्ध पद्धतीने प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या..
आरोग्यसेवा हा नागरिकांचा अधिकार आहे. त्यामुळे सुविधांच्या अभावामुळे एका रुग्णालाही उपचारापासून वंचित राहावे लागू नये, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी. आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी दूर करून नागरिकांना दर्जेदार आणि वेळेवर आरोग्यसेवा मिळाली पाहिजे, असे निर्देश देण्यात आले..
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतिश रोहिदास, आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर,
समिती सदस्य तथा जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती विश्वास कोकणे, महिला बाल कल्याण सभापती पूजाताई शिंदे, पंचायत समिती सभापती गोकर्णाताई कदम, डॉ. प्रमोद गिरी, डॉ. गोवर्धन महिंद्रकर, सातपुते सर, रवींद्र वाघमारे, प्रदीप घोणे, तीर्थराज घाडगे, राकेश सूर्यवंशी, अनंत लंगडे, राजदीप गायकवाड आदींसह जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते..
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis