
लातूर, 22 सप्टेंबर (हिं.स.)। प्रवाशाची घाईगडबडीत ऑटोमध्ये विसरलेली लॅपटॉप, महत्त्वाची कागदपत्रे, ओळखपत्रे व इतर मौल्यवान साहित्य असलेली बॅग ऑटोचालकाने प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन केली. विवेकानंद चौक पोलिसांनी तत्परता दाखवत बॅगमधील कागदपत्रांच्या आधारे मूळ मालकाचा शोध घेऊन सुमारे एक लाख रुपये किमतीचा लॅपटॉप व इतर साहित्य सुरक्षितपणे परत केले. ऑटोचालकाच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक करत पोलिसांनी त्यांचा सन्मान केला.
ऑटोचालक रमाकांत अभंग कसबे, रा. राजीव नगर, लातूर यांच्या ऑटोमधून तय्यब चांदपाशा शेख, रा. पानचिंचोली हे लातूर येथे आले होते. लातूर येथे उतरताना घाईगडबडीत शेख यांची लॅपटॉप, महत्त्वाची कागदपत्रे, ओळखपत्रे व इतर साहित्य असलेली बॅग ऑटोमध्येच राहिली. प्रवासी निघून गेल्यानंतर काही वेळाने ऑटोचालक रमाकांत कसबे यांच्या निदर्शनास ही बॅग आली.बॅगेतील साहित्याची पाहणी केल्यानंतर ती कोणीतरी प्रवासी विसरल्याचे लक्षात येताच कसबे यांनी कोणताही स्वार्थ न ठेवता सदर बॅग विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात आणून जमा केली. पोलिसांनी बॅगेतील कागदपत्रांच्या आधारे तिच्या मूळ मालकाचा शोध घेतला. त्यानंतर तय्यब चांदपाशा शेख यांच्याशी संपर्क साधून त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले.
ओळख व मालकीची खात्री केल्यानंतर पोलिसांनी सुमारे एक लाख रुपये किमतीचा लॅपटॉप, महत्त्वाची कागदपत्रे, ओळखपत्रे व इतर साहित्य असलेली बॅग तय्यब शेख यांच्या स्वाधीन केली. मौल्यवान वस्तू परत मिळाल्याने शेख यांनी विवेकानंद चौक पोलिसांचे तसेच ऑटोचालक रमाकांत कसबे यांचे आभार मानले. दरम्यान, ऑटोचालक रमाकांत कसबे यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणा व सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व हार देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक आंधळे, पोलीस अंमलदार धैर्यशील मुळे यांच्यासह पोलीस अधिकारी-अंमलदार व नागरिक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis