राहुल गांधींवरील बावनकुळेंच्या वक्तव्यावर यशोमती ठाकूर आक्रमक
अमरावती, 22 सप्टेंबर (हिं.स.) | काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. राहुल गांधी यांना ‘मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज’ असल्याचे वक्तव्य बावनकुळे
राहुल गांधींवरील वक्तव्यावरून बावनकुळे-यशोमती ठाकूर आमनेसामने


अमरावती, 22 सप्टेंबर (हिं.स.) | काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. राहुल गांधी यांना ‘मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज’ असल्याचे वक्तव्य बावनकुळे यांनी केल्यानंतर काँग्रेस नेत्या तथा माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी आक्रमक भूमिका घेत बावनकुळेंवर जोरदार पलटवार केला. वैचारिक राजकारणाऐवजी वैयक्तिक टीका करण्याचे कारण काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

इंदूर येथे राहुल गांधी यांच्या ‘छात्र की गूंज’ कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मिमिक्रीवरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी राहुल गांधींवर टीका केली. राहुल गांधी ‘सठिया गए’ असून त्यांना नागपूर अथवा दिल्लीतील मनोरुग्णालयात दाखल करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अशा प्रकारची वक्तव्ये करणे आणि त्यांची मिमिक्री करणे शोभत नसल्याचेही बावनकुळे यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगभरात मान्यता मिळाली असून विविध देशांनी त्यांचा सन्मान केला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी मोदींबाबत केलेल्या वक्तव्यांचा काहीही परिणाम होणार नाही, असे बावनकुळे म्हणाले. राहुल गांधींना देशातील जनतेने नाकारले असून जनता त्यांच्या वक्तव्यांची केवळ मजा घेत आहे, असा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, बावनकुळेंच्या या वक्तव्यावर यशोमती ठाकूर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. “बावनकुळे साहेब, तुम्ही तुमच्या जिभेवर लगाम द्या; नाहीतर तुम्हाला आग्र्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची व्यवस्था करू,” असा थेट इशारा त्यांनी दिला. पुढे अशाच प्रकारची वक्तव्ये केली तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी गाठ असल्याचेही ठाकूर म्हणाल्या. “मला वाटत होते की बावनकुळे हे गंभीर नेते आहेत. आमची लढाई वैचारिक पातळीवर आहे. मात्र आता ते वैयक्तिक टीका करू लागले आहेत. ते असे कसे बोलू शकतात?” असा सवाल ठाकूर यांनी उपस्थित केला.

राहुल गांधी हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते असून गांधी-नेहरू कुटुंबातील असल्याचा उल्लेख करत ठाकूर यांनी त्यांच्या कुटुंबाच्या देशातील योगदानाची आठवण करून दिली. आजच्या बेरोजगारी, महागाई आणि इतर प्रश्नांवर बोलण्याऐवजी सरकारकडून राहुल गांधींच्या कार्यक्रमावर टीका केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. जनता दरबारात मोठ्या संख्येने नागरिक निवेदने घेऊन येत असल्याचा संदर्भ देत ठाकूर यांनी सरकारच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “जनता दरबारात दोन ते तीन हजार निवेदने येत असतील तर लोक किती असंतुष्ट आहेत, याचा विचार करा,” असे त्या म्हणाल्या. राहुल गांधींच्या कार्यक्रमावरून सुरू झालेला वाद आता बावनकुळे आणि यशोमती ठाकूर यांच्यातील शाब्दिक संघर्षात परिवर्तित झाला असून, आगामी काळात या मुद्द्यावरून काँग्रेस आणि सत्ताधारी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande