
छत्रपती संभाजीनगर, 22 सप्टेंबर (हिं.स.)। मराठवाड्यात यंदा सरासरीच्या तुलनेत पर्जन्यमान कमी झाले असून संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर व गावनिहाय नियोजन करावे. नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा नियमित व सुरळीत पुरवठा होईल यासाठी आवश्यक उपाययोजनांचे आतापासूनच सूक्ष्म नियोजन करावे. तसेच प्रलंबित पाणीपुरवठा योजनांची कामे गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी मराठवाड्यातील पाणीटंचाईची सद्यस्थिती, पर्जन्यमान, उपलब्ध पाणीसाठा, संभाव्य टंचाई तसेच विविध पाणीपुरवठा योजनांचा विभागीय आढावा घेतला.
यावेळी अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, अपर आयुक्त ( महसूल ) रिता मैत्रेवार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या सहसचिव गीता कुलकर्णी यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे पाणीटंचाई कृती आराखडा तसेच आगामी काळात करावयाच्या अपेक्षित कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती दिली.
राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन गावनिहाय कृती आराखडा तयार ठेवावा, पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, उपलब्ध जलस्रोतांचे योग्य व्यवस्थापन करावे आणि आवश्यकतेनुसार पर्यायी जलस्रोत सज्ज ठेवावेत, अशा सूचना दिल्या.
पाणीपुरवठा योजनांची प्रलंबित कामे गतीने पूर्ण करावीत. पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करावे. पाणीटंचाईसोबतच पशुधनासाठी आवश्यक चाऱ्याच्या उपलब्धतेवरही सातत्याने लक्ष ठेवावे. संबंधित सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयातून संभाव्य टंचाईचा सामना करण्यासाठी पूर्वतयारी करावी, असे निर्देशही राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis