मेळघाट आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या विषबाधा प्रकरणी तपासणी अहवालात सेंट्रल किचनला क्लिनचीट
अमरावती, 22 सप्टेंबर, (हिं.स.) - आदिवासी विकास विभागाच्या टिटंबा शासकीय आश्रमशाळेतील ८९ विद्यार्थ्यांना अन्नातून काही दिवसांपूर्वी विषबाधा झाली होती. परंतु न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या अन्नाच्या नमुन्यात विषबाधा नसल्याचे
तपासणी अहवालात सेंट्रल किचनला क्लिनचीट


अमरावती, 22 सप्टेंबर, (हिं.स.) - आदिवासी विकास विभागाच्या टिटंबा शासकीय आश्रमशाळेतील ८९ विद्यार्थ्यांना अन्नातून काही दिवसांपूर्वी विषबाधा झाली होती. परंतु न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या अन्नाच्या नमुन्यात विषबाधा नसल्याचे नमूद केले आहे. न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचा अहवाल धारणी प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाला आहे. त्यात विद्यार्थ्यांना वितरित केलेल्या अन्नामध्ये किंवा पाण्यामधून विषबाधा होईल, असे कोणतेही तत्त्व आढळून आलेले नाहीत, असे आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त संदीप गोलाईत यांनी सांगितले.

जुलै २०२६ मध्ये धारणी तालुक्यातील टिटंबा गावात सायंकाळचे जेवण घेतल्यानंतर जवळपास ८९ विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या, पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यामुळे या सर्वच विद्यार्थ्यांना रात्रीच प्राथमिक आरोग्यकेंद्र आणि त्यानंतर धारणी व अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेमुळे टिटंबा गावामध्ये ग्रामस्थांनी आंदोलनसुद्धा केले होते. काही संस्था व ग्रामस्थांनी सेंट्रल किचन बंद करून पूर्वीप्रमाणे आश्रमशाळेतच मेस सुरू करावी, अशी मागणी केली होती.

विद्यार्थ्यांच्या पालकांच्या रोषाचा सामना आदिवासी विकास विभागाला करावा लागला होता. त्यानंतर एफडीए व पोलिसांकडून सेंट्रल किचनद्वारे विद्यार्थ्यांना पुरविण्यात आलेल्या अन्नाचे तसेच त्यांनी पिलेल्या पाण्याचे नुमने तपासणीकरिता न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. तपासणी अहवालात त्यापैकी कशातूनही विद्यार्थ्यांना विषबाधा झाली नसल्याचे नमूद केले असल्याची माहिती आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मेळघाटातील काही आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर मध्यवर्ती किचनची व्यवस्था करण्यात आली होती. ग्रामस्थांच्या रोषानंतर ही व्यवस्था बंद करून आश्रमशाळेच्या स्तरावर विद्यार्थ्यांना अन्नपुरवठा सुरू करण्यात आला होता. सेंट्रल किचनचे अन्न खाण्यायोग्य होते, हे अहवालात नमूद केल्याने पुन्हा बंद पडलेली व्यवस्था सुरू केल्या जाईल काय? याकडे लक्ष लागून आहे. या घटनेनंतर टिटंबा येथील आदिवासी आश्रमशाळेतील अधीक्षकांना जबाबदार धरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. शिवाय मुख्याध्यापकांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande