
सोलापूर, 22 सप्टेंबर (हिं.स.)।सोलापूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असलेल्या मानाच्या आजोबा गणपतीच्या परंपरेला टपाल विभागाच्या विशेष लिफाफ्याच्या अनावरणातून उजाळा मिळत आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजप्रबोधन व सांस्कृतिक परंपरांचे जतन करण्याचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि श्री श्रद्धानंद समाज सार्वजनिक आजोबा गणपती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सांस्कृतिक महोत्सव २०२६’ अंतर्गत आजोबा गणपतीच्या प्रतिमेच्या विशेष टपाल लिफाफ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. आजोबा गणपती उत्सवाला १८८५ पासूनची परंपरा असल्याचे उपलब्ध संदर्भांमध्ये नमूद केले जाते.
यावेळी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री श्री श्री १००८ डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. त्यांच्या सान्निध्यात राहण्याची संधी मिळाल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच टपाल विभागाचे वरिष्ठ अधीक्षक हेमंत खडकीकर यांचे विशेष आभार मानत आजोबा गणपतीची ऐतिहासिक परंपरा व्यापक स्तरावर पोहोचविण्यासाठी विशेष टपाल लिफाफ्याच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड