पीक कापणी प्रयोग म्हणजे केवळ आकडेवारी नाही - आ. पाटील
छत्रपती संभाजीनगर, 22 सप्टेंबर (हिं.स.) पीक कापणी प्रयोग म्हणजे केवळ आकडेवारी नाही; तो शेतकऱ्याच्या नुकसानीचा आणि त्याला मिळणाऱ्या मदतीचा आधार आहे, असे आमदार जगजीत सिंग राणा यांनी सांगितले. अत्यंत भीषण दुष्काळी संकटात कागदावर नोंदवली जाणारी आकडेवा
अ


छत्रपती संभाजीनगर, 22 सप्टेंबर (हिं.स.) पीक कापणी प्रयोग म्हणजे केवळ आकडेवारी नाही; तो शेतकऱ्याच्या नुकसानीचा आणि त्याला मिळणाऱ्या मदतीचा आधार आहे, असे आमदार जगजीत सिंग राणा यांनी सांगितले.

अत्यंत भीषण दुष्काळी संकटात कागदावर नोंदवली जाणारी आकडेवारी आणि प्रत्यक्ष शेतात उभे राहून दिसणारे पीकनुकसान यामध्ये मोठी तफावत राहू नये, यासाठी पीक कापणी प्रयोग अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कारण याच प्रयोगातून प्रत्यक्ष उत्पादनाची स्थिती अधिक स्पष्ट होते आणि शेतकरी बांधवांना मिळणाऱ्या मदतीचा मार्गही निश्चित होतो.

त्यामुळे जिल्ह्यात ज्या-ज्या ठिकाणी निर्धारित प्लॉटवर पीक कापणी प्रयोग सुरू आहेत, त्या परिसरातील शेतकरी बांधवांनी स्वतः उपस्थित राहून ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने पार पडते आहे ना, याची खात्री करून घ्यायला हवी. आज, मंगळवारी सकाळी धाराशिव तालुक्यातील कोंड येथे सुरू असलेल्या पीक कापणी प्रयोगाला स्वतः उपस्थित राहिलो. शिवारातील प्रत्यक्ष परिस्थिती पाहताना शेतकरी बांधवांवर दुष्काळाने ओढवलेल्या आर्थिक संकटाची तीव्रता किती दाहक आहे याची प्रकर्षाने जाणीव झाली.

उभे पीक दिसत असले तरी उत्पादन हातात येईलच, अशी परिस्थिती नाही. पावसातील मोठे खंड, पिकांची खुंटलेली वाढ आणि अपेक्षित उत्पादनात झालेली मोठी घट यामुळे शेतकऱ्याच्या वर्षभराच्या कष्टासमोर आज मोठे प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. उद्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब स्वतः धाराशिव जिल्ह्यात येऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी व आढावा घेणार आहेत. यावेळी पीक कापणी प्रयोगातून समोर येणारे प्रत्यक्ष वास्तव, शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि या संकटाची दाहकता त्यांच्या समोर आपण ठामपणे मांडणार आहोतच.

आता शेतकरी बांधवांना तातडीच्या आणि भरीव मदतीची गरज आहे. पीक नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद, तातडीचे नुकसान अनुदान, पीकविम्याची प्रभावी मदत, चारा व पाण्याची उपलब्धता आणि रोजगाराच्या संधी या सर्व बाबतीत शासनाने ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे.

या कठीण काळात धाराशिवचा शेतकरी एकटा नाही. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रत्यक्ष परिस्थिती पाहतील, शेतकऱ्यांचे दुःख समजून घेतील आणि या संकटातून आपल्या शेतकरी बांधवांना बाहेर काढण्यासाठी ठोस, भरीव आणि तातडीची मदत करतील, असा पूर्ण विश्वास आहे.

यावेळी कृषी सहाय्यक संगीता भागवत पतंगे, तालुका कृषी अधिकारी सलमा तांबोळी, सोनाली गाडेकर, तलाठी श्री माळी, मंडळ अधिकारी कृषी मजीद शेख, कृषी पर्यवेक्षक श्री लेणेकर आणि विमा प्रतिनिधी अमर भडंगे आदींसह परिसरातील शेतकरी बांधवही उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande