नात्यांमधला आपलेपणा आणि माणुसकीची गोष्ट सांगणारी ‘धाकट्या सुनबाई’ येतेय प्रेक्षकांच्या भेटीला
मुंबई, 22 सप्टेंबर (हिं.स.)। नाती, आपलेपणा, प्रेम आणि माणुसकी यांची सुंदर गोष्ट सांगणारी ‘धाकट्या सुनबाई’ ही नवी मालिका २८ सप्टेंबरपासून झी मराठी वर सुरू होत आहे. या मालिकेत दोन कुटुंबांची गोष्ट, त्यांचे विचार आणि नात्यांमधील गुंतागुंत पाहायला मिळ
मुंबई


मुंबई, 22 सप्टेंबर (हिं.स.)। नाती, आपलेपणा, प्रेम आणि माणुसकी यांची सुंदर गोष्ट सांगणारी ‘धाकट्या सुनबाई’ ही नवी मालिका २८ सप्टेंबरपासून झी मराठी वर सुरू होत आहे. या मालिकेत दोन कुटुंबांची गोष्ट, त्यांचे विचार आणि नात्यांमधील गुंतागुंत पाहायला मिळणार आहे. आपल्या माणसांची साथ आणि नात्यांमधला विश्वास आयुष्याला कसा अर्थ देतो, याची गोष्ट राधिका आणि वेदांतच्या आयुष्यातून ‘धाकट्या सुनबाई’ मालिकेत उलगडणार आहे.

कृष्ण मंदिराच्या पायऱ्यांवर लहानपणी सापडलेली *राधिका* ही आप्पा आणि निर्मलाची दत्तक मुलगी म्हणून जगत आहे. आप्पांनी तिला कृष्णाचा प्रसाद मानून आपल्या मुलीप्रमाणे वाढवलं. सालस, मनमिळाऊ आणि उत्साही असलेली राधिका नेहमी इतरांच्या मदतीला धावून जाते. मात्र, घरातील गोदाक्का तिला आजही ‘परकी’ मानतात. त्यामुळे प्रेम मिळत असूनही राधिकाच्या मनात आपल्या खऱ्या घराचा आणि आपल्या माणसांचा शोध कायम आहे. दुःखाच्या क्षणी ती कृष्णाशी मनमोकळेपणाने बोलते आणि त्यालाच आपला सखा मानते.

दुसरीकडे आहे *पटवर्धन* कुटुंबातील *वेदांत* . ‘आराधना’ या पूजा साहित्य, अत्तर आणि अगरबत्तीच्या व्यवसायाचा वारसदार. वेदांत हुशार, सुसंस्कृत आणि जबाबदार आहे. आई दमयंतीच्या शिस्तीत आणि विचारांमध्ये वाढलेला वेदांत कुटुंबाच्या परंपरांना महत्त्व देतो. मात्र, राधिकेला भेटल्यानंतर त्याच्या विचारांसमोर एक नवा प्रश्न उभा राहतो. माणसाची ओळख त्याच्या रक्ताने आणि कुळाने ठरते की त्याच्या मनाने? राधिकेमुळे वेदांतचा स्वतःच्या विचारांकडे पाहण्याचा प्रवास सुरू होतो.

या मालिकेत चिन्मयी मोरे राधिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर पटवर्धन कुटुंबात मंदार जाधव वेदांतची भूमिका साकारत आहे.

अशा या नात्यांनी, भावनांनी आणि माणुसकीने जोडलेल्या दोन कुटुंबांची गोष्ट घेऊन ‘धाकट्या सुनबाई’ येत आहेत २८ सप्टेंबरपासून दररोज संध्या ६:३० वा. सदैव तुमच्या झी मराठीवर.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande