डोंबिवलीचा राजा सहकार मित्र मंडळाचा ४३ वा गणेशोत्सव उत्साहात
डोंबिवली, 22 सप्टेंबर (हिं.स.)। शहरातील प्रसिद्ध सहकार मित्र मंडळाचा ४३ वा सार्वजनिक गणेशोत्सव यंदा विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात येत आहे. डोंबिवलीचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणरायाच्या उत्सवासाठी मंडळाच्
Ph01


डोंबिवली, 22 सप्टेंबर (हिं.स.)। शहरातील प्रसिद्ध सहकार मित्र मंडळाचा ४३ वा सार्वजनिक गणेशोत्सव यंदा विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात येत आहे. डोंबिवलीचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणरायाच्या उत्सवासाठी मंडळाच्या वतीने भक्तांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यंदाच्या गणेशोत्सवाची श्री गुरुदेव दत्त संप्रदायाचे महत्त्व ही संकल्पना असून भारतीय अध्यात्म परंपरेतील प्राचीन दत्त संप्रदायाची ओळख आणि गुरुतत्त्वाचे महत्त्व भाविकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मंडळाचे अध्यक्ष संजय विचारे यांच्या संकल्पनेतून हा देखावा साकारण्यात आला आहे. मूर्तिकार.गोविंद पांचाळ यांच्या कलाकृतीतील श्री दत्तमूर्तीसह कापड व लाकडी फ्रेम यांसारख्या पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्यात आला आहे. कलादिग्दर्शक प्रवीण डुंबरे तसेच मंडळाचे अध्यक्ष संजय विचारे, सेक्रेटरी रवी म्हात्रे, खजिनदार जयराम कांदू तसेच इतर सदस्यांच्या परिश्रमातून देखाव्याला आकर्षक स्वरूप प्राप्त झाले आहे.

देखाव्यामध्ये दत्त संप्रदायातील विविध संत व अवतारांची माहिती देण्यात आली आहे. श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री गजानन महाराज, शिर्डीचे साईनाथ आणि गगनगडाचे गगनगिरी महाराज यांच्या कार्याची व अध्यात्मिक योगदानाची माहिती मिळते. गणेशोत्सवानिमित्त भजन, अभंग, पूजा-अर्चा, गणेशयाग, सत्यनारायण पूजा, महाप्रसाद, महाआरती यांसह विविध संगीत, नृत्य, स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत वैद्यकीय तपासणी शिबिरासारखे उपक्रमही राबविण्यात येत आहेत. गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक परंपरा, सामाजिक बांधिलकी, सांस्कृतिक वारसा आणि पर्यावरणपूरकतेचा संगम साधण्यात आला असून भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन श्रींचे दर्शन व विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने अध्यक्ष संजय विचारे यांनी केले आहे.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande