
अमरावती, 22 सप्टेंबर, (हिं.स.) - गेल्या सात ते आठ वर्षांपासून टाकरखेडासंभू गावाच्या नावाने रात्रीची बसफेरी बंद असल्याने विद्यार्थी, नोकरदार, महिला व नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. अखेर माजी उपसरपंच प्रदीप शेंडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, तब्बल आठ वर्षांनंतर टाकरखेडासंभू येथे रात्री मुक्कामी बसफेरी सुरू झाली आहे. अमरावती येथून रात्री आठ वाजता बस सुटून टाकरखेडासंभू येथे मुक्कामी राहणार आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता ही बस टाकरखेडासंभू येथून अमरावतीकडे परतीचा प्रवास करणार आहे. रविवारी (ता. २०) रात्री या बसने पहिली फेरी केली. सकाळी बसफेरीचे औपचारिक स्वागत करण्यात आले. यावेळी चालक ए. एम. मोहोड व वाहक एस. आर. भिहाडे यांचा सत्कार करण्यात आला. गावासाठी रात्रीची बस सुरू व्हावी, यासाठी माजी उपसरपंच प्रदीप शेंडे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला
. विद्यार्थ्यांचा मोर्चा, विभागीय नियंत्रकांना निवेदने तसेच अमरावती आणि नागपूर येथे प्रत्यक्ष भेटी घेऊन निवेदने देण्यात आली. पालकमंत्र्यांकडेही बसफेरी सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. या पाठपुराव्याची दखल घेत विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी तातडीने बस सुरू करण्याचे आदेश दिले. संबंधित अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बसफेरी सुरू करण्यात आली.
रात्रीच्या वेळी अमरावतीहून गावाकडे परतणाऱ्या नागरिकांसह विद्यार्थ्यांना या बसफेरीचा मोठा फायदा होणार आहे. रात्री गावाच्या नावाने बस उपलब्ध नसल्याने नागरिकांना खासगी वाहनांवर किंवा इतर मार्गांवर अवलंबून राहावे लागत होते. आता नियमित बसफेरी सुरू झाल्याने ही गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. बसफेरी सुरू झाल्याबद्दल नागरिकांनी एसटी महामंडळ, पालकमंत्री, संबंधित अधिकारी तसेच माजी उपसरपंच प्रदीप शेंडे यांचे आभार मानले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी