
अमरावती, 22 सप्टेंबर (हिं.स.)। शहरातील साफसफाईचा ठेका वारंवार बंद पडत असून, सलग दोन-तीन दिवस स्वच्छता व्यवस्था ठप्प राहणे ही गंभीर बाब आहे. गणपती व महालक्ष्मी सणांच्या पार्श्वभूमीवर शहरात अस्वच्छता निर्माण झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या परिस्थितीला सत्ताधारी भाजपा व त्यांच्या मित्रपक्षांचे प्रशासनिक नियोजनातील अपयश जबाबदार असल्याची टीका काँग्रेस शहराध्यक्ष बबलु शेखावत यांनी केली.
‘स्वच्छ अमरावती, सुंदर अमरावती’चा नारा देत सत्ता मिळविणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या काळातच स्वच्छता व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. कधी सफाईचा ठेका बंद पडतो, तर कधी कर्मचाऱ्यांचा संप होतो. त्याचा थेट परिणाम नागरिकांवर होत असल्याचे शेखावत यांनी म्हटले.
एका बाजूला मालमत्ता कर वाढविण्याच्या चर्चा सुरू आहेत, तर दुसऱ्या बाजूला नागरिकांना मूलभूत स्वच्छता सुविधाही नियमितपणे मिळत नाहीत. कराच्या माध्यमातून पैसा घेऊन सुविधा देण्यात सत्ताधारी अपयशी ठरत असतील, तर नागरिकांनी प्रश्न विचारायचा तरी कोणाला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
भटक्या-विमुक्त नागरिकांचे प्रश्न, स्वच्छता व आरोग्य व्यवस्था, रेल्वेस्टेशन ते राजकमल चौक उड्डाणपूल तसेच विविध नागरी सुविधांचे प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याचा आरोपही त्यांनी केला.शहराचा कारभार सांभाळता येत नसेल आणि प्रशासनावर पकड ठेवता येत नसेल, तर सत्ताधारी भाजपा व मित्रपक्षांच्या नेत्यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी शेखावत यांनी केली. अमरावतीकरांना आश्वासन नव्हे, तर नियमित स्वच्छता, चांगल्या नागरी सुविधा आणि जबाबदार प्रशासन हवे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी