
सोलापूर, 22 सप्टेंबर (हिं.स.)जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत असलेल्या सुमारे अडीच हजार शाळांचे भौतिक सुविधांच्या उपलब्धतेनुसार वर्गीकरण करण्यात आले आहे. यामध्ये ५७१ शाळा ड श्रेणीत असून, या सर्व शाळा पुढील चार महिन्यांत क श्रेणीत आणण्यासाठी अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी काटेकोर नियोजन करावे. शाळांच्या भौतिक सुविधांच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. शाळांचा भौतिक विकास झाल्यास शैक्षणिक गुणवत्तेतही वाढ होण्यास मदत होईल. त्यामुळे शैक्षणिक सुविधा व गुणवत्ता विकास अभियानाला सर्वांनी प्राधान्य द्यावे, असे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.नियोजन समिती सभागृहात शैक्षणिक सुविधा व गुणवत्ता विकास अभियानांतर्गत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, महापौर विनायक कोंड्याल, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे, आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, राजेंद्र राऊत, राजू खरे, नारायण पाटील, अभिजीत पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सचिन जगताप, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मुळे, गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड