
वर्धा, 22 सप्टेंबर (हिं.स.) | शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतापर्यंत वर्षभर सुलभ आणि सुरक्षित वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेच्या पहिल्या टप्प्यातील कामांना देवळी-पुलगाव विधानसभा मतदारसंघात प्रारंभ झाला. या योजनेअंतर्गत वायफड येथील पाणंद रस्त्याच्या कामाचे आमदार राजेश बकाने यांच्या उपस्थितीत सुरू झाले.
यावेळी बोलताना आमदार राजेश बकाने म्हणाले, शेतकरी हा आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी चांगला रस्ता उपलब्ध असणे ही मूलभूत गरज आहे. मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेच्या माध्यमातून मतदारसंघातील शेतकऱ्यांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यक तो पाठपुरावा सुरू असून टप्प्याटप्प्याने पाणंद रस्त्यांची कामे मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. पाणंद रस्ते सक्षम झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टर, हार्वेस्टर व इतर कृषी यंत्रसामग्री शेतापर्यंत नेणे सोपे होणार आहे. तसेच कापूस, सोयाबीन, तूर, गहू, हरभरा यांसह विविध शेतीमालाची शेतातून बाजारपेठेपर्यंत वाहतूक अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि वाहतूक खर्च कमी होण्यास हातभार लागणार आहे. यावेळी वर्ध्याचे उपविभागीय अधिकारी कुश मोटवानी, देवळी उपविभागीय अधिकारी प्रफुल चौधरी, देवळी नगरपरिषद उपाध्यक्ष राहुल चोपडा यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी