
मुंबई, 22 सप्टेंबर (हिं.स.)। भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) बॉम्बे येथील विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्या प्रकरणाची पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या मदतीने सखोल चौकशी सुरू आहे. यासोबतच भविष्यात अशा घटना टाळण्याच्या उद्देशाने संस्थेच्या प्रशासनाने वसतिगृहातील खोल्यांमधील सीलिंग फॅन हटवून त्याऐवजी भिंतीवर बसविण्यात येणारे फॅन लावण्याचे काम मंगळवारपासून सुरू केले आहे.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, साहिल वाकोडे हा वसतिगृह क्रमांक ४ मधील आपल्या खोलीत मृतावस्थेत आढळला होता. साहिलच्या मृत्यूच्या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज हा तपासातील महत्त्वाचा दुवा ठरला आहे. क्राइम ब्रँचचे पथक परीक्षा हॉलपासून वसतिगृहापर्यंतच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहे, जेणेकरून घटनेपूर्वी साहिलच्या हालचालींचा संपूर्ण क्रम समोर येऊ शकेल.
घटनेच्या दिवशी दुपारी सुमारे १२.३० ते १२.४५ वाजेदरम्यान परीक्षा हॉलमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये साहिलच्या हालचाली रेकॉर्ड झाल्या होत्या. परीक्षा संपण्यास सुमारे १५ मिनिटे बाकी असताना साहिल खिशातील काहीतरी पाहण्यासाठी खाली वाकल्याचे दिसून आले. त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या एका प्राध्यापकाने त्याला इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे नेले.
परीक्षा हॉलमधून बाहेर पडल्यानंतर साहिल कॅम्पसमध्ये जाताना सीसीटीव्हीमध्ये दिसून आला. त्यानंतर दुपारी सुमारे १.२५ वाजता तो वसतिगृहातील आपल्या खोलीत दाखल झाला. तपासानुसार, त्यानंतर तो खोलीबाहेर पडला नाही. पोलिस आता परीक्षा हॉल, कॅम्पस आणि वसतिगृहातील सीसीटीव्ही फुटेज एकत्र जोडून घटनेपूर्वीची संपूर्ण वेळापत्रक तयार करण्याचे काम करत आहेत.
या प्रकरणात सोमवारी, २१ सप्टेंबर रोजी आयआयटी बॉम्बे प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला यांना विद्यार्थी व्यवहार अधिष्ठाता या पदावरून हटवले आहे. त्याचवेळी साहिलच्या वडिलांच्या तक्रारीच्या आधारे मुंबई पोलिसांनी परीक्षेशी संबंधित प्राध्यापक आणि पर्यवेक्षक सूर्यनारायण दुल्ला यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणातील योग्य तथ्यांपर्यंत पोहोचण्यासाठीच सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule