
छत्रपती संभाजीनगर, 22 सप्टेंबर (हिं.स.)। 'फोनची वाट पाहू नका, थेट रुग्णालयात या', मनोज जरांगेंची मोडी अन् फारसी लिपीच्या अभ्यासकांना थेट साद, मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर कुणबी नोंदी शोधण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मोठं आवाहन केलं आहे. मोडी लिपीचा अभ्यास असलेल्या जाणकारांनी, मोडी लिपी वाचता येणाऱ्यांनी तसेच फारसीच्या अभ्यासकांनी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये येऊन भेटावं, असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मोडी लिपी आणि फारसी भाषेच्या अभ्यासकांना येत्या काही दिवसांत रुग्णालयात येण्याचं आवाहन केलं. कुणबी नोंदी शोधण्यासाठी सरकारच्या समितीसोबत काम करण्यासाठी या अभ्यासकांची मदत घेतली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.'फोनची वाट पाहू नका, थेट रुग्णालयात या' मनोज जरांगे म्हणाले, “मोडीलिपी अभ्यासकांनी गॅलेक्सी हॉस्पिटलला यावे. उद्यापासून रविवारपर्यंत सर्वांनी रुग्णालयात यायचे आहे. फोनची वाट पाहू नका. आम्हाला मोडीलिपीचे अभ्यासक कोण आहेत हे माहीत नाही. त्यामुळे तुम्ही 27 सप्टेंबरच्या आत रुग्णालयात येऊन भेटा. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात जिथे जिथे मोडी लिपीचे अभ्यासक असतील त्यांनी उद्या परवा, शनिवार, रविवार या पाच सहा दिवसात येऊन मला भेटा. बुधवारपासून रविवारपर्यंत कधीही या. तुम्ही तुमचे योगदान द्या. आपल्याला आपल्या लेकरासाठी काम करायचे आहे.”
------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis