
मुंबई, 22 सप्टेंबर (हिं.स.)। 'सन मराठी'वरील 'मी संसार माझा रेखिते' या मालिकेला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. अनुप्रिया प्रत्येक संकटावर मात करत स्वतःचं अस्तित्व निर्माण करत आहे. यामुळे स्त्रियांना एक वेगळीच ऊर्जा मिळत आहे. मालिकेत नवनवीन ट्विस्ट सह नव्या पात्रांची एन्ट्री देखील पाहायला मिळतेय. आता मालिकेत अभिनेता निरंजन कुलकर्णी महत्त्वपूर्ण भूमिकेत पहायला मिळणार आहे.
या भूमिकेबद्दल निरंजन कुलकर्णी म्हणाला की, 'सन मराठी'वरील हि माझी पहिलीच मालिका आहे. त्यात 'मी संसार माझा रेखिते' ही प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. त्यामुळे या मालिकेतील महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी माझी निवड केली त्यासाठी निर्माते रवी करमकर व 'सन मराठी' वाहिनीचे मनापासून आभार. मालिकेतील माझ्या भूमिकेबद्दल सांगायचे झाले तर, हा एक यशस्वी बॅडमिंटन कोच आहे. त्याच्या अकॅडमीमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी अनेकांची उत्सुकता असते. बाहेरून पाहताना त्याची एक वेगळीच प्रतिमा दिसते. मात्र या पात्राची आणखी एक बाजू आहे, जी आतापर्यंत कोणालाच माहीत नाही. ही दुसरी बाजू नेमकी काय आहे, त्याच्या व्यक्तिमत्त्वामागे दडलेलं रहस्य काय आहे, हे प्रेक्षकांना मालिका पाहताना लक्षात येईल.
पुढे तो म्हणाला की,माझी ही भूमिका माझ्यासाठी खरोखरच खूप आव्हानात्मक आहे. यापूर्वी मी पौराणिक, ऐतिहासिक तसेच कौटुंबिक मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. प्रत्येक भूमिका साकारताना त्या व्यक्तिरेखेचा सखोल अभ्यास आणि तयारी करणे माझ्यासाठी नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. मात्र ‘मी संसार माझा रेखिते’मधील या भूमिकेसाठी मला विशेष तयारी करावी लागत आहे. कारण या व्यक्तिरेखेमध्ये अनेक छटा आहेत. मला खात्री आहे की, ही भूमिका देखील माझ्या अभिनयाच्या प्रवासात एक वेगळी ओळख निर्माण करणारी ठरेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर