
लातूर, 22 सप्टेंबर (हिं.स.)। शिरूर अनंतपाळ तालुक्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामासह आगामी पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होत आहे. तालुक्याची एकूण सरासरी पर्जन्यमानाची आकडेवारी ७२२.८ मिमी असताना यंदा आतापर्यंत केवळ २९८.४ मिमी म्हणजे सरासरीच्या ४७.९ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील जलस्रोतांची पाणीपातळी झपाट्याने खालावत असून प्रमुख मध्यम प्रकल्पही तळ गाठण्याच्या स्थितीत आहेत.
तालुक्यातील गावांची तहान भागविणाऱ्या घरणी मध्यम प्रकल्पात केवळ १३.२० टक्के, तर साकोळ मध्यम प्रकल्पात अवघा ६.९६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. डोंगरगाव बॅरेज जवळपास कोरडा ठाक झाला असून मांजरा नदीपात्राचीही अशीच अवस्था आहे. त्यामुळे शेतीसह आगामी काळातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. पावसाअभावी ग्रामीण भागातील विहिरी, बोअर आणि इतर जलस्रोतांवरही ताण वाढला आहे. संभाव्य पाणीटंचाई
लक्षात घेऊन प्रशासनाकडून १४ बोअर अधिग्रहण करण्यात आले असून आणखी काहींची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तालुक्यासाठी पाणीटंचाईचा अंदाजित आराखडाही तयार करण्यात आला आहे.
पावसाचे प्रमाण सरासरीच्या निम्म्याहूनही कमी राहिल्याने खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. अनेक भागांत पिके करपली असून, शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणी, उत्पादन घट आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उभा राहिला आहे. आता पाणीटंचाईचे सावटही गडद होत असल्याने 'गतवर्षी ओला, यंदा कोरडा दुष्काळ' अशी परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे. जलसाठे झपाट्याने कमी होत असताना उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन, पिण्याच्या पाण्याला प्राधान्य आणि अनधिकृत पाणीउपशावर नियंत्रण ठेवणे गरजेचे झाले आहे. प्रशासनासमोर आगामी काळात ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हाताळण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis