
नांदेड, 22 सप्टेंबर, (हिं.स.)। नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील मौजे ब्रह्मपुरी शेत सर्व्हे नं. ४४/१ व ४४/२ जवळील गोदावरी नदीच्या पात्रातील खडक असलेल्या ठिकाणी पूजा-अर्चा करण्याच्या कारणावरून महानुभाव पंथीय व मुस्लिम समाजामध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३ चे कलम १६३ अन्वये सदर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी दिलेल्या आदेशानुसार दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपासून दि. २२ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत हा प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहे.
या आदेशानुसार प्रतिबंधित क्षेत्राची चतुःसीमा पुढीलप्रमाणे आहे— पूर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरी नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला/दर्ग्याची संरक्षण भिंत.
महानुभाव पंथाच्या विविध धार्मिक कार्यक्रमांनिमित्त तसेच आगामी सण-उत्सवांच्या काळात या परिसरात भाविकांची मोठ्या संख्येने ये-जा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हिंदू, मुस्लिम तसेच महानुभाव पंथीय नागरिकांकडून संबंधित ठिकाणी दर्शन, भेट किंवा धार्मिक कारणासाठी गर्दी झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने हा प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे.
या आदेशानुसार संबंधित प्रतिबंधित क्षेत्रात हिंदू, मुस्लिम व महानुभाव पंथीय नागरिकांनी दर्शनासाठी येणे अथवा भेट देणे यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. शासकीय कर्तव्यावरील अधिकारी-कर्मचारी तसेच जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षक यांनी परवानगी दिलेल्या व्यक्तींना हा आदेश लागू राहणार नाही.
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३ मधील तरतुदींनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी आदेशात नमूद केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis