
पुणे, 22 सप्टेंबर (हिं.स.)।
युवकांनी रोजगाराच्या उपलब्ध संधींचा लाभ घेण्यासाठी रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासोबतच कौशल्यविकास, प्रशिक्षण, रोजगार व स्वयंरोजगारासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. रोजगारासाठी संवादकौशल्य, व्यक्तिमत्त्व, मुलाखतीला सामोरे जाण्याची पद्धत आणि स्वतःचे प्रभावी सादरीकरण यांनाही महत्त्व आहे. यासाठी रोजगार मेळाव्याच्या अनुषंगान जिल्ह्यातील तालुकास्तरावरील प्रत्येक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) युवकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे, असे रोजगार व उद्योजकता अधिकारी राजेश धर्माधिकारी यांनी सांगितले.
जय हनुमान गणेश मंडळ, भेलेकरवाडी, ता. भोर येथे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित लोकसंवाद उपक्रमात युवकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जय हनुमान गणेश मंडळ, भेलेकरवाडीचे अध्यक्ष विशाल कंक, माजी अध्यक्ष धीरज दानवले, मंडळ अधिकारी सी. पी. जगताप, ग्राम महसूल अधिकारी विवेक भालेराव उपस्थित होते.
रोजगार मेळाव्याचा युवकांनी लाभ घ्यावा
येत्या २९ सप्टेंबर रोजी कौशल्य विकास विभागातर्फे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. युवकांनी आपल्या पात्रतेनुसार सहभागी होऊन रोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा. तसेच, बेरोजगारांनी rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन रोजगार व उद्योजकता अधिकारी राजेश धर्माधिकारी यांनी केले.
रोजगार मेळाव्यात विविध कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध असून, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस क्षेत्रात संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. पदवीधर, आयटीआय तसेच विविध कौशल्याधारित पात्रता असलेल्या युवकांनी आपल्या पात्रतेनुसार रोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु