
सोलापूर, 22 सप्टेंबर (हिं.स.)। सेवा संकल्प अभियानांतर्गत पंढरपूर पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील विविध गावांमध्ये घरकुल लाभार्थी मेळावे व विशेष कॅम्प आयोजित करण्यात येत आहेत. या उपक्रमातून घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे गावपातळीवर तसेच तालुकास्तरावर निराकरण करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती गटविकास अधिकारी अमोल जाधव यांनी दिली.
पंढरपूर तालुक्यातील कासेगाव, वाखरी, रोपळे, मुंडेवाडी, वाडी-कुरोली, भाळवणी आदी गावांमध्ये घरकुल लाभार्थी मेळावे व कॅम्प घेण्यात आले. या कॅम्पमध्ये संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष गावात उपस्थित राहून घरकुल लाभार्थ्यांशी संवाद साधत आहेत. लाभार्थ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.
या उपक्रमामध्ये पंचायत विस्तार अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी, कृषी अधिकारी तसेच सहाय्यक गटविकास अधिकारी यांचा सहभाग आहे. विविध विभागांच्या समन्वयातून लाभार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
घरकुल योजनेतील प्रलंबित हप्ते, घरकुलासाठी जागेशी संबंधित अडचणी, घरकुल कामाच्या नोंदी तसेच मस्टर प्रक्रियेसंदर्भातील अडचणी याबाबत लाभार्थ्यांकडून माहिती घेण्यात येत आहे. संबंधित प्रकरणांची तपासणी करून पात्र लाभार्थ्यांची प्रलंबित कामे नियमानुसार मार्गी लावण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड