जळगावात किरकोळ वादातून मित्राची हत्या; दोघांना अटक
जळगाव, 22 सप्टेंबर (हिं.स.) | नॉनव्हेज जेवण न दिल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मित्राच्या हत्येत झाल्याची धक्कादायक घटना फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भालोद येथे घडली. दारूच्या नशेत झालेल्या वादानंतर दोन मित्रांनी सहकारी मजूर
जळगावात किरकोळ वादातून मित्राची हत्या; दोघांना अटक


जळगाव, 22 सप्टेंबर (हिं.स.) | नॉनव्हेज जेवण न दिल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मित्राच्या हत्येत झाल्याची धक्कादायक घटना फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भालोद येथे घडली. दारूच्या नशेत झालेल्या वादानंतर दोन मित्रांनी सहकारी मजूर असलेल्या मित्राच्या डोक्यात दगड घातल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी फैजपूर पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे.मात्र नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

रमेश ईश्वरसिंग भंवर (वय 35, रा. खंडवा, मध्यप्रदेश) असे मृत मजुराचे नाव आहे. तर सुरज कोळी आणि सुरज उर्फ गोलू नेमाडे दोघांना अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश भंवर, सुरज कोळी आणि सुरज उर्फ गोलू नेमाडे हे तिघे मित्र असून मजुरी करून उदरनिर्वाह करीत होते. तिघांनाही एकत्र बसून दारू पिण्याची सवय होती. तिघे भालोद येथे दारू पीत बसले होते.दरम्यान, रमेशने स्वतःच्या पैशातून आणलेले मासे एका मित्राकडे बनवण्यासाठी दिले होते. नॉनव्हेजचे जेवण आपल्या वडिलांनाही द्यावे, असा आग्रह सुरज कोळी याने धरल्याने रमेश आणि सुरज यांच्यात वाद झाला. वाद वाढल्यानंतर दोन्ही संशयितांनी रमेशच्या डोक्यात दगड घातल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

या हल्ल्यात रमेशचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी मृतदेह एमएसईबीजवळील सुमारे 100 मीटर अंतरावरील एका खड्ड्यात टाकून घटनास्थळावरून पळ काढल्याचे सांगण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच फैजपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपासाची चक्रे गतिमान करीत दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास फैजपूर पोलीस करीत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande