
दोन ऑक्टोबरला वर्ध्यात विदर्भ राज्य जन संकल्प मेळावा
वर्धा, 22 सप्टेंबर (हिं.स.) | महाराष्ट्र दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. राज्यावर ११ लाख कोटीचे कर्ज आहे. या राज्यात पुन्हा कितीही वर्ष राहिलो, तरी विदर्भ विकसित होणार नाही. नागपूर कराराप्रमाणे लोकसंख्येच्या प्रमाणात वाटा मिळत नाही, त्याचा निषेध म्हणून विदर्भातील सर्व ११० तालुक्यांत २८ सप्टेंबरला नागपूर कराराची होळी करण्यात येणार असल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समिती व शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी दिली.
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या जनजागृतीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने वर्ध्यातील विठ्ठल रुक्मिणी सभागृहात दुपारी एक वाजता विदर्भ राज्य जन संकल्प मेळावा आयोजित केला आहे. दोन आक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पर्वावर सेवाग्राम आश्रम येथून २०० दुचाकींच्या रॅलीचे आयोजन केल्याची माहिती माजी आमदार ऍड. वामनराव चटप यांनी दिली. सर्व क्षेत्रात विदर्भ समृद्ध असतानाही विदर्भ पश्चिम महाराष्ट्राचे तुलनेत मागासलेला आहे, युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध नाही, उच्च शिक्षणाच्या सुविधा नाही, राज्यातील नोकरीत अत्यल्प वाटा आहे. महिला सुरक्षीत नाही, कुपोषणाने हजारो बालके ग्रस्त आहे. शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा, शेतमाल प्रक्रिया उद्योग नाही, शेतकरी आत्महत्येत विदर्भाचा आणि त्यात वर्धा जिल्हा अव्वल आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, या मागणीसाठी होणा-या दुचाकी रॅली व जन संकल्प मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीने केले आहे, यावेळी जिल्हा समन्वयक मधुसूदन हरणे, विदर्भ पार्टीचे अध्यक्ष अरुण केदार, युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर, नागपूर जिल्हाध्यक्ष गिरीश तितरमारे, वर्धा जिल्हाध्यक्ष पद्माकरराव भांडारकर यांच्यासह आदी उपस्थित होते.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी