संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारणाची कामे हाती घ्यावीत – जिल्हाधिकारी कर्डिले
नांदेड, 22 सप्टेंबर (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यात चालू पावसाळी हंगामात अपेक्षित सरासरीच्या तुलनेत पर्जन्यमानात घट झाली आहे. त्यामुळे आगामी काळात संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता उपलब्ध पावसाच्या पाण्याचे जा
संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारणाची कामे हाती घ्यावीत – जिल्हाधिकारी कर्डिले


नांदेड, 22 सप्टेंबर (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यात चालू पावसाळी हंगामात अपेक्षित सरासरीच्या तुलनेत पर्जन्यमानात घट झाली आहे. त्यामुळे आगामी काळात संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता उपलब्ध पावसाच्या पाण्याचे जास्तीत जास्त संवर्धन करून भूजल पातळी वाढविण्यासाठी प्रभावी जलसंधारणाची कामे हाती घेणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर सेवा संकल्प अभियानांतर्गत रोजगार हमी व विकसित भारत रोजगार व आजीविका हमी ग्रामीण योजनेच्या माध्यमातून जलतारा, सिमेंट नाला बांध, विहिरींचे पुनर्भरण तसेच बोअरवेल/बोअर पुनर्भरणाची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात येत आहेत.

ग्रामीण भागातील कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देतानाच टिकाऊ व उत्पादक मालमत्ता निर्माण करणे, हा रोजगार हमी योजनेचा प्रमुख उद्देश आहे. जमीन, पाणी व वृक्षांच्या विकासातून शेती व शेतीशी संबंधित उत्पादक मालमत्ता निर्माण करण्यावर या योजनेत विशेष भर देण्यात आला आहे. या माध्यमातून गावातील नागरिकांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होण्यासोबतच पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी ते अडवून जमिनीत मुरविण्यास मदत होणार आहे.

शेतकरी, ग्रामस्थांनी कामांची मागणी ग्रामपंचायतीकडे नोंदवावी

शेतकरी, ग्रामस्थ व नागरिकांनी आपल्या गावातील तसेच शेतजमिनीवरील आवश्यक जलसंधारणाच्या कामांचे प्रस्ताव संबंधित ग्रामपंचायतीकडे सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये जलतारा, सिमेंट नाला बांध, विहीर पुनर्भरण आणि बोअरवेल/बोअर पुनर्भरण या कामांना प्राधान्य देता येणार आहे.

ज्या शेतकरी व नागरिकांना त्यांच्या शेतजमिनीवर किंवा परिसरात ही कामे घ्यावयाची आहेत, त्यांनी संबंधित ग्रामपंचायत कार्यालय, ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक किंवा पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधून कामाची मागणी नोंदवावी. प्राप्त मागणी व प्रस्तावांची प्रचलित नियमांनुसार तपासणी करून पात्र व अनुज्ञेय कामांचे नियोजन करण्यात येणार आहे.

ग्रामपंचायतींनीदेखील आपल्या कार्यक्षेत्रातील जलस्रोत, नाले, पाणलोट क्षेत्र, विहिरी व बोअरची सद्यस्थिती लक्षात घेऊन आवश्यक कामांचे प्राधान्यक्रम निश्चित करावेत. तसेच ग्रामसभेत या कामांचा एकत्रित आराखडा तयार करून मान्यतेनंतर पुढील कार्यवाहीसाठी सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande