
नवी दिल्ली, 22 सप्टेंबर (हिं.स.)। देशातील हवामानाचा पॅटर्न पुन्हा बदलताना दिसत असून, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली हवामान प्रणाली अधिक तीव्र झाली आहे. या प्रणालीचा परिणाम पूर्व आणि मध्य भारतातील काही भागांवर होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ओडिशा आणि उत्तर किनारी आंध्र प्रदेशासाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, महाराष्ट्रातही पुढील काही दिवस पावसाचे वातावरण कायम राहणार आहे. विशेषतः विदर्भात २३ ते २६ सप्टेंबरदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील वेल मार्क्ड लो प्रेशर एरिया पश्चिम-वायव्य दिशेने सरकत २१ सप्टेंबरला डिप्रेशनमध्ये रूपांतरित झाले. त्यानंतर पुढील २४ तासांत त्याची तीव्रता वाढून डीप डिप्रेशनमध्ये रूपांतर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. ही प्रणाली पश्चिम-वायव्य दिशेने पुढे सरकत २३ सप्टेंबरच्या रात्री ते २४ सप्टेंबरच्या पहाटेच्या सुमारास उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीदरम्यान धडकण्याची शक्यता आहे.
डीप डिप्रेशन ही चक्रीवादळापेक्षा कमी तीव्र, मात्र सामान्य डिप्रेशनपेक्षा अधिक प्रभावी हवामान प्रणाली आहे. भारतीय हवामान विभागाच्या वर्गीकरणानुसार, डिप्रेशनमध्ये कमाल सातत्यपूर्ण वाऱ्याचा वेग ताशी ३१ ते ४९ किलोमीटर असतो, तर डीप डिप्रेशनमध्ये तो ताशी ५० ते ६१ किलोमीटरपर्यंत असतो. त्यापुढे वाऱ्याचा वेग ताशी ६२ किलोमीटर किंवा त्यापेक्षा अधिक झाल्यास ही प्रणाली चक्रीवादळाच्या श्रेणीत जाते. सध्याच्या प्रणालीमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस, वादळी वारे आणि समुद्र खवळण्याची शक्यता आहे.
ओडिशात २२ सप्टेंबरला अतिवृष्टीची शक्यता असून, २३ आणि २४ सप्टेंबरला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. २५ सप्टेंबरला काही भागांत अतिवृष्टी, तर २६ सप्टेंबरला मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. उत्तर किनारी आंध्र प्रदेशातही २२ सप्टेंबरला अतिवृष्टी, तर २३ आणि २४ सप्टेंबरला अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. या काळात मेघगर्जनेसह पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात या प्रणालीचा थेट चक्रीवादळासारखा परिणाम अपेक्षित नसला तरी तिच्या पश्चिमेकडील वाटचालीमुळे मध्य भारतातील वातावरणावर परिणाम होऊ शकतो. विदर्भात २३ आणि २४ सप्टेंबरला मुसळधार पावसासह मेघगर्जना आणि विजांचा इशारा देण्यात आला आहे. २५ आणि २६ सप्टेंबरलाही मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. कोकण आणि गोव्यात २२ व २३ सप्टेंबरला मुसळधार पावसासह मेघगर्जना आणि विजांचा इशारा असून, २४ सप्टेंबरला मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. मध्य महाराष्ट्रातही २२ व २३ सप्टेंबरला मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात २२ सप्टेंबरला मेघगर्जनेसह पाऊस, तर २३ सप्टेंबरला मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी आणि नागरिकांनी पुढील काही दिवस हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule