
छत्रपती संभाजीनगर, 23 सप्टेंबर (हिं.स.)। मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानांतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ५७४ आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, त्याद्वारे ८९ हजार ८७९ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.
तपासणी करण्यात आलेल्यांमध्ये ३४ हजार ८१३ पुरुष, ४१ हजार ५१० महिला आणि १३ हजार ५५६ बालकांचा समावेश आहे. यापैकी १७ हजार ६२१ जणांच्या रक्त तपासण्या करण्यात आल्या असून ६३० जणांची ईसीजी तपासणी करण्यात आली. तसेच २ हजार २४३ नागरिकांना आभा व गोल्डन कार्ड काढून देण्यात आले.या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, शहरी आरोग्य यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्थांची आरोग्य यंत्रणा तसेच धर्मादाय रुग्णालयांतील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेण्यात येत आहे.
गणेशोत्सवाच्या काळात नागरिक मोठ्या संख्येने गणेश मंडळांना भेट देत असल्याने मंडळांच्या ठिकाणीच आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या माध्यमातून नागरिकांना प्राथमिक आरोग्य तपासणी, आरोग्यविषयक मार्गदर्शन तसेच आवश्यकतेनुसार पुढील उपचारासाठी संदर्भ सेवा उपलब्ध करून दिली जात आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियान व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे. गणेश मंडळांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविणाऱ्या या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या आरोग्य शिबिरांचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis