
यवतमाळ, 23 सप्टेंबर, (हिं.स.)। अमरावती शिक्षक मतदार संघाचे आमदार किरण सरनाईक यांचा कार्यकाळ डिसेंबर २०२६ मध्ये संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम भारत निर्वाचन आयोगाने जाहीर केला आहे. निवडणुकीचे बिगुल वाजताच जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. इच्छुक उमेदवारांसह विविध राजकीय पक्ष आणि शिक्षक संघटनांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत जिल्ह्यात पाच हजार ८८२ शिक्षक मतदार होते. यंदा ही संख्या वाढून सहा हजार ५४७ झाली आहे. त्यामुळे वाढलेला मतदारवर्ग निवडणुकीच्या निकालात महत्वाची भूमिका बजावणार आहे.
मागील निवडणुकीत जिल्ह्यात १९ मतदान केंद्रे होती. यंदा मतदारसंख्या वाढल्याने मतदान केंद्रांच्या व्यवस्थेकडेही लक्ष लागले आहे. शिक्षक मतदारसंघातील निवडणूक ही पारंपरिक विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीपेक्षा वेगळी असते. शिक्षक मतदारांची भूमिका, विविध शिक्षक संघटनांची ताकद आणि उमेदवारांची वैयक्तिक संपर्कयंत्रणा यांना या निवडणुकीत विशेष महत्व असते. त्यामुळे मतदारसंख्या वाढल्याने जुन्या राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच संभाव्य उमेदवारांकडून शिक्षकांशी संपर्क वाढविण्याची तयारी सुरू होती. आता अधिकृत कार्यक्रम जाहीर झाल्याने भेटीगाठी, संघटनांच्या बैठका आणि उमेदवारीसाठीची चाचपणी यांना वेग येणार आहे. विविध शिक्षक संघटनांकडूनही आपापल्या भूमिकेबाबत चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने आता संभाव्य उमेदवारांची नावे, पक्षांचा पाठिंबा आणि शिक्षक संघटनांच्या भूमिका याकडे लक्ष लागले आहे. त्यामुळे आगामी काळात शिक्षक मतदारसंघातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे आहेत.
पक्षीय गणितापेक्षा शिक्षकांचे प्रश्न महत्वाचे
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून प्रचाराची दिशा ठरविली जाण्याची शक्यता आहे. जुनी पेन्शन योजना, शिक्षकांच्या सेवाशर्ती, अनुदानित शाळांचे प्रश्न, रिक्त पदे, वेतन व थकीत देयके, शिक्षण क्षेत्रातील बदल आणि शिक्षकांवरील प्रशासकीय कामांचा वाढता भार यांसारखे मुद्दे पुन्हा चर्चेत येऊ शकतात.
------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी