

जिल्ह्यात विविध ठिकाणी पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी साधला संवाद
नाशिक, 23 सप्टेंबर (हिं.स.)।
: पावसाच्या खंडामुळे जिल्ह्यातील काही भागांमध्ये शेतपिकांची अवस्था नाजूक झाली आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची वस्तुस्थिती जाणून घेऊन मंडळनिहाय तातडीने पंचनामे करावेत आणि त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज प्रशासनाला दिले.
पालकमंत्री श्री. महाजन यांनी आज जिल्ह्यातील शिरवाडे वणी, मंगरूळ फाटा, चिंचवे, पाटणे, नगाव, मेहुणे, वाखारी, भार्डी, अस्तगाव आदी गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध शेतपिकांची प्रत्यक्ष पाहणी करून पिकांची सद्यस्थिती, पावसाचे प्रमाण, पाण्याची उपलब्धता तसेच संभाव्य नुकसानीबाबत शेतकऱ्यांकडून माहिती घेतली.
यावेळी पालकमंत्री श्री. महाजन म्हणाले की, अल निनोच्या प्रभावासह पावसाच्या खंडामुळे काही भागांमध्ये पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे. पिकांचे नुकसान झाले असल्यास त्याची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत.
मंडळनिहाय पंचनामे करताना प्रत्यक्ष शेतातील परिस्थिती लक्षात घेऊन नुकसानीची नोंद करावी. पंचनाम्याची कार्यवाही कोणत्याही प्रकारे विलंब न करता सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी शासन सहानुभूतीपूर्वक समजून घेत असून पंचनाम्याच्या आधारे आवश्यक ती मदत तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर कार्यवाही करण्यात येईल, असे पालकमंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.
पाण्याची उपलब्धता कमी असलेल्या भागात जनावरांसाठी चारा उपलब्ध राहावा, यासाठी चारा पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याबाबत कृषी विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना आवश्यक कृषी मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध उपाययोजना केल्या असून वीज बिल माफी तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसारख्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे, असेही पालकमंत्री श्री. महाजन यांनी नमूद केले.
यावेळी आमदार सुहास कांदे, आमदार गोकुळ गीते, आमदार डॉ. राहुल आहेर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, उपविभागीय अधिकारी कैलास कडलग (चांदवड), बाबासाहेब गाढवे (येवला), तहसीलदार विशाल नाईकवाडे (निफाड), सुनील सैन्दाणे (नांदगाव) आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI