
रायगड, 23 सप्टेंबर (हिं.स.)। नातं आणि माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत थरारक घटना पोलादपूर शहरानजीक समोर आली आहे. क्षुल्लक किंवा अज्ञात कारणावरून डोक्यात संताप गेलेल्या एका जन्मदात्या बापानेच आपल्या २४ वर्षीय पोटच्या मुलावर धारदार शस्त्राने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केली. साहिल सचिन चिकणे (वय २४) असे हत्या झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव असून, या रक्तपाताने संपूर्ण पोलादपूर तालुका हादरून गेला आहे. हत्येनंतर पसार झालेल्या आरोपी पित्याला महाड शहर पोलिसांनी अत्यंत शिताफीने सापळा रचून अवघ्या काही तासांत बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलादपूर तालुक्यातील ओंबळी गावचे मूळ रहिवासी असलेले चिकणे कुटुंब काही महिन्यांपूर्वीच मुंबई येथून राहण्यासाठी आले होते. पोलादपूर शहरानजीक लोहारे-देऊळकोंड येथील आडरस्त्यावरील एका निर्जन इमारतीत ते वास्तव्यास होते. अज्ञात कारणावरून वडील सचिन चिकणे यांचा मुलगा साहिल याच्याशी वाद झाला. रागाच्या भरात वडील सचिन चिकणे याने धारदार शस्त्राने साहिलवर जीवघेणा हल्ला केला. या रक्तरंजित हल्ल्यात गंभीर जखमी झालेला साहिल जागीच ठार झाला.
हत्येनंतर आरोपी बापाने घटनास्थळावरून तातडीने पळ काढला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलादपूर पोलिसांनी तातडीने महाड शहर पोलिसांना सतर्क केले. महाड वाहतूक पोलिसांनी शहराबाहेरील बी. एस. फुटाला सभागृहाजवळ साध्या वेषात पथक तैनात केले. तांत्रिक विश्लेषण, मोबाईलचे लोकेशन आणि गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी सचिन चिकणे याला ताब्यात घेऊन जेरबंद केले. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)