
लातूर, 23 सप्टेंबर, (हिं.स.)। देवणी परिसरात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थ व गुटख्याची अवैध विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली. या कारवाईत १ लाख २३ हजार २४० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि १ लाख १० हजार रुपये किमतीचा ऑटो, असा एकूण २ लाख ३३ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
देवणी मार्गावर ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या आदेशाने पथक कारवाईसाठी कार्यरत असताना, आंबेगाव ते देवणी रस्त्याच्या कडेला काळ्या रंगाच्या एमएच ५५ ए ०११० क्रमांकाच्या ऑटोमधून प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी आणला जात असल्याची माहिती मिळाली.
माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ऑटो थांबवून झडती घेतली. ऑटोच्या मागील सीटवर ठेवलेल्या खाकी रंगाच्या पोत्यामध्ये प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा आढळून आला.
याप्रकरणी विक्रम मदनराव जाधव (वय ३५, रा. हांचनाळ, ता. देवणी, जि. लातूर) याच्याकडून विमल पान मसाला, डायरेक्टर स्पेशल पानमसाला, तंबाखूचे २० पुडे आणि व्ही-१ सुगंधी तंबाखू आदी १ लाख २३ हजार २४० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. तसेच गुटख्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला एमएच ५५ ए ०११० क्रमांकाचा ऑटो, अंदाजे १ लाख १० हजार रुपये किमतीचा, जप्त करण्यात आला.
या प्रकरणी विक्रम मदनराव जाधव याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम १२३, २७४, २७५, २२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, सदर प्रतिबंधित गुटखा सचिन माने (रा. मानकेश्वर, ता. मेहकर, जि. बिदर) याने आंबेगावजवळ आरोपीकडे आणून दिल्याचे आरोपीने सांगितले आहे. याबाबत पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. पथकात पोलीस अंमलदार प्रेमदास राठोड, रसूल पठाण, युवराज गिरी आणि जमीर शेख यांचा सहभाग होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis