
बीड, 23 सप्टेंबर, (हिं.स.)। धारुर तालुक्यातील तांदळवाडी येथील अष्टविनायक गणेश मंडळाच्या वतीने यंदा शेतकऱ्यांच्या अडचणी आणि व्यथा मांडणारा कोरडा दुष्काळ देखावा तसेच विविध वास्तवदर्शी देखावे साकारण्यात आले. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या संकटांचे प्रभावी चित्रण या देखाव्यांमधून करण्यात आले.
यामध्ये डुकरांकडून शेतकऱ्यांवर होणारे हल्ले, अंगावर वीज पडून शेतकऱ्यांचा होणारा मृत्यू, शेतात काम करताना सर्पदंशामुळे होणारा मृत्यू, शेतात ये-जा करण्यासाठी असलेला खडतर रस्ता व चिखलातून मार्ग काढणारा शेतकरी, तसेच दुष्काळामुळे त्रस्त झालेला शेतकरी आणि त्याची व्यथा व्यक्त करणारी पत्नी, असे विविध जिवंत देखावे साकारण्यात आले होते. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष अडचणी प्रशासनासमोर मांडण्याचा प्रयत्न मंडळाच्या वतीने करण्यात आला. यावेळी अष्टविनायक गणेश मंडळाच्यावतीने कृषी मंडळ अधिकारी राधा चिरके यांना निवेदन देऊन परिसरातीलदुष्काळी परिस्थितीची दखल घेत दुष्काळ जाहीर करावा, तसेच शेतकऱ्यांना पीक विमा व अनुदान मंजूर करावे, अशी मागणी केली. यावेळी कृषी मंडळ अधिकारी राधा चिरके, कृषी सहाय्यक अधिकारी पूनम माळी, मुख्याध्यापिका रेखा नखाते, मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, अष्टविनायक गणेश मंडळाचे कार्यकर्ते तसेच शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis