परभणी जिल्ह्यातील जणगणनेची माहिती अचूक व वेळेत तयार करण्याचे निर्देश
परभणी, 23 सप्टेंबर, (हिं.स.)। भारतीय जनगणना 2027 अंतर्गत जिल्ह्यातील जनगणना प्रक्रिया अचूक, सर्वसमावेशक आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रगणकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक घर, कुटुंब आणि सदस्यांची माहिती काळजीपूर्वक तयार
Q


परभणी, 23 सप्टेंबर, (हिं.स.)। भारतीय जनगणना 2027 अंतर्गत जिल्ह्यातील जनगणना प्रक्रिया अचूक, सर्वसमावेशक आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रगणकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक घर, कुटुंब आणि सदस्यांची माहिती काळजीपूर्वक तयार करावी. कार्यक्षेत्रातील प्रत्यक्ष स्थिती आणि नोंदी यामध्ये अचूकता राहणे आवश्यक असून, तयार झालेली माहिती निर्धारित कालमर्यादेत संबंधित पोर्टलवर अपलोड करता येईल, यासाठी पूर्वतयारी पूर्ण ठेवावी, असे निर्देश मुंबई येथील जनगणना संचालनालयाचे उपसंचालक सागर बागुल यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात भारतीय जनगणना 2027 संदर्भात प्रगणक व संबंधित अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जनगणना संचालनालयाचे सांख्यिकी अन्वेषक पवन गोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील तहसीलदार तसेच नियुक्त प्रगणक, सहाय्यक महसुल अधिकारी अलताफ मिया, या प्रशिक्षणास उपस्थित होते.

‘जनगणना से जनकल्याण तक’ या ब्रीदवाक्यानुसार भारतीय जनगणना 2027 ची माहिती अचूकपणे संकलित करणे महत्त्वाचे आहे. जनगणनेच्या कामासाठी क्षेत्र निश्चित करताना प्रत्येक घरगणना सूचीगट हा सामान्यतः एक प्रगणना गट म्हणून विचारात घेतला जातो, असे त्यांनी सांगितले.

एखाद्या घरगणना सूचीगटातील लोकसंख्या 800 पेक्षा अधिक असल्यास, त्याच्या बाह्य भौगोलिक सीमा कायम ठेवून त्याचे दोन किंवा त्यापेक्षा अधिक उप-गटांमध्ये विभाजन करता येते. मात्र, एका घरगणना सूचीगटातील क्षेत्र दुसऱ्या घरगणना सूचीगटातील क्षेत्राशी एकत्र करून नवीन गट तयार करता येणार नाही. त्यामुळे प्रगणकांनी क्षेत्राची भौगोलिक सलगता आणि निश्चित सीमा कायम ठेवूनच गटांची रचना करावी, असे मार्गदर्शन श्री. बागुल यांनी केले.

जनगणना प्रक्रियेत संबंधित कार्यक्षेत्रातील एकूण घरे, जनगणना घरे, कुटुंबांची संख्या आणि प्रत्येक कुटुंबातील सदस्यसंख्या यांची अचूक नोंद करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मागील जनगणनेच्या तुलनेत क्षेत्रात झालेली वाढ, कमी झालेली संख्या, नव्याने निर्माण झालेली घरे तसेच प्रत्यक्ष क्षेत्रातील बदल यांची पडताळणी करून नोंदी अद्ययावत कराव्यात.

कार्य क्षेत्रात घरांचे विभाजन करणे आवश्यक असल्यास ते नियमानुसार करावे. विभाजित झालेली घरे योग्य घरयादी गटात समाविष्ट करावीत. एखादे कुटुंब किंवा घर दुसऱ्या घरयादी गटात स्थलांतरित झाले असल्यास त्याची नोंद संबंधित ठिकाणी करून, शक्यतो जवळच्या योग्य प्रगणना सूचीगटात त्याचा समावेश करावा. प्रगणना गटांची संख्या शक्य तितकी कमी ठेवावी; मात्र प्रत्यक्ष लोकसंख्या व क्षेत्रफळाचा विचार करून आवश्यकता असल्यास अतिरिक्त गट तयार करावेत, असेही श्री. बागुल यांनी स्पष्ट केले.

जनगणना प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संक्षिप्त घरयादी तयार करणे महत्त्वाचे आहे. या प्रक्रियेत घरांची ओळख, क्षेत्रातील इमारती, जनगणना घरे आणि कुटुंबांची माहिती यांची योग्य नोंद घ्यावी. संक्षिप्त घरयादी तयार करताना घराचा उपयोग अथवा उद्देश, तसेच कुटुंब प्रमुखाचा तपशील यासह आवश्यक माहिती अचूकपणे भरावी. हा तपशील घरयादीच्या डेटाच्या आधारे पुढील प्रक्रियेसाठी उपयोगात आणला जाणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष क्षेत्रातील स्थिती आणि डिजिटल नोंद यामध्ये तफावत राहणार नाही, याची दक्षता प्रगणकांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

जनगणना क्षेत्राची पाहणी करताना मागील नोंदीपासून झालेल्या बदलांची नोंद करणे आवश्यक आहे. घर बदलणे, कुटुंब एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा दुसऱ्या गावात स्थलांतरित होणे, जुने घर पाडले जाणे, नवीन घराचे बांधकाम पूर्ण होणे, नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असणे, कुटुंब प्रमुखाच्या नावात बदल होणे आदी बाबींची प्रत्यक्ष पडताळणी करून संबंधित नोंदी अद्ययावत कराव्यात. यामुळे जनगणना यादीतील प्रत्येक घराची सद्यस्थिती स्पष्ट होण्यास मदत होणार असून, कोणतेही घर किंवा कुटुंब नोंदीतून वगळले जाणार नाही, याची दक्षता घेता येईल.

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande