परभणी - महिला शेतकरी सक्षमीकरण अभियानातून 107 महिलांना प्रमाणपत्राचे वाटप
परभणी, 23 सप्टेंबर, (हिं.स.)। शेती क्षेत्रात महिलांना स्वतंत्र व अधिकृत ओळख मिळावी, तसेच विविध शासकीय योजना, कर्ज, अनुदान व कृषीविषयक सुविधांचा लाभ त्यांना थेट मिळावा, या उद्देशाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0 अंतर्गत ‘महिला शेतकरी सक्षमी
परभणी - महिला शेतकरी सक्षमीकरण अभियानातून 107 महिलांना प्रमाणपत्राचे वाटप


परभणी, 23 सप्टेंबर, (हिं.स.)। शेती क्षेत्रात महिलांना स्वतंत्र व अधिकृत ओळख मिळावी, तसेच विविध शासकीय योजना, कर्ज, अनुदान व कृषीविषयक सुविधांचा लाभ त्यांना थेट मिळावा, या उद्देशाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0 अंतर्गत ‘महिला शेतकरी सक्षमीकरण अभियान’ राबविण्यात येत आहे. उपविभागीय कृषी अधिकारी, परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली कमलापूर, ता. पूर्णा येथे राबविण्यात आलेल्या या अभियानाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

गणेशोत्सव व महालक्ष्मी (गौराई) उत्सवाचे औचित्य साधून कमलापूर येथे गणेशोत्सवाच्या मंचावर महिला शेतकरी सक्षमीकरणाबाबत विशेष जनजागृती व प्रचार-प्रसिद्धी कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात गावातील महिलांशी थेट संवाद साधून शेती क्षेत्रातील त्यांचा सहभाग, शासकीय योजनांचा लाभ आणि महिला शेतकऱ्यांना उपलब्ध असलेल्या विविध सुविधांची माहिती देण्यात आली. यावेळी कमलापूर येथील एकूण 107 महिला शेतकऱ्यांचे महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करण्यात आले. “शेती क्षेत्रातील महिलांचे योगदान वाढवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, तसेच शासकीय योजनांचा लाभ थेट महिलांपर्यंत पोहोचविणे हा महिला शेतकरी सक्षमीकरण अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत आहे,” अशी माहिती उपविभागीय कृषी अधिकारी धनराज जगताप यांनी दिली.

उपविभागीय कृषी अधिकारी धनराज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमात महिलांना शेतीच्या विविध टप्प्यांमध्ये त्यांची भूमिका व सहभाग, आधुनिक शेती तंत्रज्ञान, दर्जेदार बियाणे, आधुनिक शेती पद्धती, कृषीपूरक व गृहउद्योग, विविध बँक कर्ज सुविधा तसेच शासनाच्या विविध कृषी योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

महिला शेतकऱ्यांना केवळ शेतीच्या कामांमध्ये सहभागी न ठेवता त्यांना शेतकरी म्हणून स्वतंत्र ओळख, निर्णय प्रक्रियेत सहभाग आणि उपलब्ध शासकीय सुविधांपर्यंत सुलभ पोहोच मिळणे आवश्यक आहे. या दृष्टीने महिला शेतकरी प्रमाणपत्राचे महत्त्व, ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया आणि त्यासाठी आवश्यक बाबींची माहितीही यावेळी देण्यात आली.

गणेशोत्सव व महालक्ष्मी उत्सवानिमित्त एकत्र आलेल्या महिलांशी तंत्रज्ञान समन्वयक यशोदा सपकाळ आणि नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापन समन्वयक दीपक कन्हाळे यांनी थेट संवाद साधला. शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उपलब्ध कृषी सुविधा, नैसर्गिक साधनसंपत्तीचे व्यवस्थापन आणि महिलांचा कृषी क्षेत्रातील वाढता सहभाग याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. महिलांनीही शेतीशी संबंधित विविध बाबी, योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया आणि उपलब्ध कर्ज व अनुदान सुविधांबाबत माहिती जाणून घेतली. उत्सवाच्या माध्यमातून महिलांपर्यंत कृषी विभागाच्या योजना व उपक्रमांची माहिती थेट पोहोचविण्याचा हा उपक्रम ठरला.

महिला शेतकऱ्यांनी शासकीय योजनांची माहिती घेऊन पात्रतेनुसार उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा आणि कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा, असे आवाहनही कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समूह सहाय्यक रेखा कन्हाळे, कृषीताई शितल सूर्यवंशी, अंगणवाडी सेविका यमुना जाधव आणि सीआरपी गंगासागर सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande