
परभणी, 23 सप्टेंबर (हिं.स.)। चारठाणा परिसराला पर्यटनस्थळाचा ‘ब’ दर्जा मंजूर करून अधिकृत पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यात यावे, अशी मागणी जि. प.च्या माजी आरोग्य व बांधकाम सभापती मीनाताई राऊत यांनी पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात, चारठाणा हे ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक वारसा लाभलेले असून पर्यटनाच्या दृष्टीने या परिसरात मोठी क्षमता आहे. चारठाणा हे राज्य मार्गावर वसलेले असून येथे प्राचीन महादेव मंदिरांची परंपरा, शिवकालीन वास्तु तसेच सुमारे ४५ फूट उंच दिपस्तंभासारखी ऐतिहासिक व धार्मिक वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे या परिसराचा पर्यटन विकास केल्यास भाविक व पर्यटकांसाठी महत्त्वाचे आकर्षण निर्माण होऊ शकते, असे म्हटले आहे. तसेच प्राचीन मंदिरांच्या दुरुस्ती व संवर्धनाचे काम सुरू असताना परिसरातील ऐतिहासिक वारशाची माहिती अधिक व्यापक पातळीवर पोहोचणे आवश्यक आहे. ऐतिहासिक वास्तु, मंदिरे व पुरातत्त्वीय अवशेषांचे जतन करून त्यांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास केल्यास चारठाण्याच्या वैभवात भर पडू शकते.
पर्यटन विकासातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी चारठाणा परिसराला पर्यटनस्थळाचा ‘ब’ दर्जा प्राप्त झाल्यास येथे येणाऱ्या भाविक व पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता असून स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. चारठाणा परिसरातील ऐतिहासिक व धार्मिक स्थळांची माहिती देणारे फलक उभारणे, स्वच्छता, पाणी, रस्ते व इतर मूलभूत सुविधांचा विकास करणे,ऐतिहासिक व पुरातत्त्वीय वारशाचे शास्त्रीय सर्वेक्षण करून शिलालेखांचे वाचन, संवर्धन, आवश्यक उत्खनन तसेच पर्यटकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर विशेष प्रयत्न करावेत, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.याप्रसंगी हभप नामदेव महाराज ढवळे, नानासाहेब राऊत, सुनिल भोंबे, मतीन तांबोळी, सुधाकर शिरसागर आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis