
रत्नागिरी, 23 सप्टेंबर, (हिं.स.) । गवारेड्याच्या हल्ल्यात मरण पावलेल्या स्वप्नीलच्या पेडामकर यांच्या कुटुंबाला वन विभागाकडून शासकीय मदतीचा धनादेश देण्यात आला.
काही दिवसांपूर्वी साडवली (ता. संगमेश्वर) येथील सह्याद्रीनगर परिसरातील ३४ वर्षीय स्वप्नील पेडामकर यांच्यावर आंबव येथे गवारेड्याने हल्ला केला. या हल्ल्यात स्वप्नील गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर वेळीच उपचार सुरू करण्यात आले; मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने चौथ्या दिवशी त्यांचे निधन झाले.
स्वप्नीलच्या कुटुंबाला योग्य ती मदत आणि न्याय मिळावा, यासाठी सह्याद्री नगर मित्रमंडळाने केवळ स्थानिक पातळीवर मदत करून न थांबता स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही घटना आणून दिली. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे झालेल्या मानवी हानीबाबत शासनस्तरावरून मदत मिळावी, यासाठीही मंडळाने सातत्याने पाठपुरावा केला.
याच पाठपुराव्याला यश मिळून आज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वप्नील यांच्या आईकडे शासकीय मदतीचा धनादेश सुपूर्द केला. यामुळे स्वप्नीलच्या कुटुंबीयांना काहीसा दिलासा मिळाला.
वन विभागाने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल विभागीय वनधिकारी गिरीजा देसाई, सहाय्यक वन संरक्षक प्रियांका लगड, परीक्षेत्र वनअधिकारी विक्रम गुरव, देवरूख वनपाल सागर गोसावी, साखरपा वनरक्षक सहयोग कराडे, आरवली वनरक्षक सूरज तेली, दाभोळे वनरक्षक सुप्रिया काळे, फुणगूस वनरक्षक आकाश कुडकर आदींचे विशेष आभार मानण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी