
शेतकऱ्यांना सरसकट मदतीची ग्वाही; पिकांचे नुकसान झाल्याचे प्रत्यक्ष पाहणीत स्पष्ट
छत्रपती संभाजीनगर, 23 सप्टेंबर (हिं.स.)। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी बळी भोसले यांच्या शेताच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त ऊस आणि सोयाबीन पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी पिकांची सद्यस्थिती जाणून घेत शेतकऱ्यांकडून शेतीविषयक माहिती घेतली.
पेरणी कधी करण्यात आली, पिकाला किती पाऊस मिळाला, पावसाचा खंड किती काळ राहिला तसेच त्याचा पिकांच्या वाढीवर आणि संभाव्य उत्पादनावर काय परिणाम झाला, याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांशी सविस्तर संवाद साधला. सोयाबीनचे पीक पूर्णपणे हातचे गेले असून उसाची वाढही खुंटल्याचे त्यांनी नमूद केले.
पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे प्रत्यक्ष पाहणीतून स्पष्ट होत असल्याचे सांगत शेतकऱ्यांना शासनाकडून सरसकट मदत केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर आल्याने परिसरातील शेतकरीही त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी पुढे आले. पावसाच्या खंडामुळे झालेले नुकसान, उत्पादनातील संभाव्य घट, हंगामासाठी केलेली गुंतवणूक आणि त्याचा कुटुंबाच्या अर्थकारणावर होणारा परिणाम याबाबत शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.
पावसाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाणून घेतल्या. अडचणीच्या काळात शेतकरी कुटुंबांना आवश्यक आधार देण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील. तसेच मुलांचे शिक्षण अडचणीमुळे बंद पडणार नाही, यासाठीही आवश्यक मदत करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis