
परभणी, 23 सप्टेंबर (हिं.स.)। पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे खरीप हंगामावर गंभीर संकट ओढवले असून अनेक भागांत कोरड्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर उभी पिके करपू लागली आहेत. शेतजमिनींना भेगा पडत असून पिकांना जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.
यंदा सुरुवातीला पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र त्यानंतर पावसाने अचानक दडी मारल्याने परिस्थिती झपाट्याने बदलली. सोयाबीन पीक सध्या शेंगा भरण्याच्या महत्त्वाच्या अवस्थेत असताना पावसाचा खंड पडल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. कापूस, तूर आणि इतर खरीप पिकांनाही पाण्याची तीव्र गरज भासत आहे. आभाळाकडे डोळे, हातात कोरडी माती! पावसाअभावी चाऱ्याची उपलब्धताही कमी होत चालली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर पिकांसोबतच पशुधन जगविण्याचेही मोठे आव्हान उभे राहिले आहे. विहिरी, बोअरवेल आणि इतर जलस्रोतांवरील पाण्याचा ताण वाढत असल्याने आगामी काळात परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती व्यक्त होत आहे.
पावसाचा खंड आणि पिकांची सद्यस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून पिकांचे पंचनामे करावेत, पीकविमा नुकसानभरपाईची प्रक्रिया सुरू करावी आणि दुष्काळी उपाययोजना लागू कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. शेतकऱ्यांचा आक्रोश केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित नसून प्रशासनाने प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करावी, अशी मागणी आहे. “कार्यालयात बसून दुष्काळ कळणार नाही; आमच्या शेताच्या बांधावर या, करपलेलं पीक पाहा, अशी संतप्त भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis