मानवत-परभणी महामार्गावरील खड्डे आणि पुलांची गंभीर दुरवस्था
परभणी, 23 सप्टेंबर (हिं.स.)। मानवत-परभणी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरील रस्त्याची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून, ठिकठिकाणी पडलेले मोठमोठे खड्डे आणि जुन्या पुलांची झालेली अवस्था वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. विशेषतः खरवडे-किन्होळा परिसरा
मानवत-परभणी महामार्गावरील खड्डे आणि पुलांची गंभीर दुरवस्था


परभणी, 23 सप्टेंबर (हिं.स.)। मानवत-परभणी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरील रस्त्याची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून, ठिकठिकाणी पडलेले मोठमोठे खड्डे आणि जुन्या पुलांची झालेली अवस्था वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. विशेषतः खरवडे-किन्होळा परिसरातील पुलावर मोठे खड्डे पडले असून, काही ठिकाणी रस्ता आरपार खचल्याचे चित्र आहे. पुलाच्या खालच्या बाजूचे काँक्रीट निखळून लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत.

या मार्गावर दररोज एसटी बस, ट्रक, अवजड वाहने तसेच चारचाकी आणि दुचाकी वाहनांची मोठी वर्दळ असते. पुलावरील खड्डे चुकविताना वाहनचालकांना वाहने वळवावी लागत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. तसेच पुलाच्या खालच्या भागातून काँक्रीटचे तुकडे निखळून पडत असल्याने पुलाच्या संरचनात्मक सुरक्षिततेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महामार्गाचे रुंदीकरण आणि रस्त्याचे काम झाल्यानंतरही काही जुने पूल मात्र जुन्याच अवस्थेत राहिले आहेत. पुलावरील काँक्रीटची झीज, उघड्या पडलेल्या लोखंडी सळ्या आणि रस्त्यावरील गंभीर खड्डे लक्षात घेता संबंधित यंत्रणेने तज्ज्ञ अभियंत्यांकडून पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

मानवत-परभणी मार्गावरील धोकादायक ठिकाणांची तातडीने पाहणी करून मोठे खड्डे बुजविणे, रस्त्याची दुरुस्ती करणे, जुन्या पुलांची संरचनात्मक तपासणी करणे तसेच आवश्यक त्या ठिकाणी पुलांचे मजबुतीकरण व नूतनीकरण करण्याची मागणी करण्यात येत आहे.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande