तक्रार करूनही अधिकारी सुट्टीवर; किल्ले रायगड अंधारात बुडाल्याने शिवभक्तांमध्ये तीव्र रोष
रायगड, 23 सप्टेंबर, (हिं.स.)। रयतेला प्रकाशाची दिशा दाखवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक राजधानी किल्ले रायगड मागील तब्बल दहा दिवसांपासून अंधारात बुडाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुरातत्व विभागाच्या कमालीच्या दुर्लक्षामुळे गडावरील
Despite complaining, the officer is on leave! Shiv devotees are furious as Raigad Fort plunges into darkness


रायगड, 23 सप्टेंबर, (हिं.स.)। रयतेला प्रकाशाची दिशा दाखवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक राजधानी किल्ले रायगड मागील तब्बल दहा दिवसांपासून अंधारात बुडाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुरातत्व विभागाच्या कमालीच्या दुर्लक्षामुळे गडावरील पवित्र राजसदर, मेघडंबरी, छत्रपतींचे सिंहासन आणि समाधी परिसर अंधारात बुडाला असून, यामुळे राज्यभरातील शिवप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत, म्हणजेच १३ सप्टेंबरपासून गडावरील संपूर्ण विद्युत पुरवठा खंडित झाला होता. किल्ले रायगड हॉटेल व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष रघुवीर देशमुख आणि सुरक्षा रक्षकांनी या गंभीर प्रकाराबाबत पुरातत्व विभागाचे केअरटेकर संकेत कावलकर यांच्याकडे तातडीने तक्रार नोंदवली होती. मात्र, संबंधित अधिकाऱ्याने नैसर्गिक अडचणींचे कारण देत याकडे दुर्लक्ष केले आणि सणासाठी गावी निघून गेले, असा गंभीर आरोप शिवभक्तांनी केला आहे. गडावर रात्रीच्या वेळी पहारा देणाऱ्या सुरक्षा रक्षकांनाही अंधारातच गस्त घालावी लागत होती.

दरम्यान, या घटनेचे गांभीर्य लक्षात येताच रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी दिल्लीतून केंद्रीय पुरातत्व विभागाच्या मुख्यालयाशी संपर्क साधून संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. तर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी, अंधारात काही अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण, असा थेट जाब विचारत दोषींवर कडक कारवाईचा इशारा दिला आहे. चौफेर संताप उसळल्यानंतर अखेर वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे आश्वासन देण्यात आले असले, तरी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande