
समाज कल्याण विभागाचे महाविद्यालयांना निर्देश
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, २३ सप्टेंबर (हिं.स.) : तांत्रिक अथवा प्रशासकीय प्रक्रियेमुळे अनुसूचित जाती प्रवर्गातील कोणताही विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी समाज कल्याण विभागाने महाविद्यालयांना २०१९-२० ते २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांतील प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी महाडीबीटी १.० पोर्टल ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत सक्रिय ठेवण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व संबंधित महाविद्यालयांनी या कामाला ‘सर्वोच्च प्राधान्य’ देऊन विहित मुदतीत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण सचिन कवले यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या सुधारित धोरणानुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून महाडीबीटी प्रणालीचे व्हर्जन २.० कार्यान्वित करण्यात आले आहे. मात्र, २०१९-२० ते २०२५-२६ या कालावधीतील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात अर्ज अद्याप प्रलंबित आहेत. या अर्जांचा निपटारा करण्याबरोबरच संबंधित शैक्षणिक वर्षांचे आवश्यक अहवाल तयार करण्यासाठी महाडीबीटी १.० पोर्टल ३० सप्टेंबरपर्यंत उपलब्ध करून देण्यात आले आहे.
प्रलंबित अर्जांची छाननी करून बिल जनरेट करता येणार
मुदतवाढीच्या कालावधीत महाविद्यालये आणि संबंधित विभागांना प्रलंबित अर्जांची छाननी करता येणार आहे. पात्र प्रकरणांमध्ये बिल जनरेट करण्याची प्रक्रियाही पूर्ण करता येईल. त्यामुळे जुन्या शैक्षणिक वर्षांतील प्रलंबित अर्जांचा निपटारा करण्यासाठी उपलब्ध कालावधीचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘Sent Back’ अर्जांसाठी Re-Apply सुविधा सध्या स्थगित
विद्यार्थ्यांना ‘Sent Back’ करण्यात आलेले अर्ज पुन्हा सादर करण्याची Re-Apply सुविधा सध्या स्थगित ठेवण्यात आली आहे. महाडीबीटी १.० वरील काम पूर्ण झाल्यानंतर आणि डेटा मायग्रेशनची प्रक्रिया झाल्यानंतर हे अर्ज महाडीबीटी २.० पोर्टलवर Re-Apply करण्यासाठी उपलब्ध होतील. त्यामुळे अशा अर्जांबाबत विद्यार्थ्यांनी आणि महाविद्यालयांनी नवीन प्रणालीतील पुढील प्रक्रियेची नोंद घ्यावी. महाडीबीटी १.० पोर्टलवर १० ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत कोणताही नवीन अर्ज स्वीकारला जाणार नाही. विद्यार्थ्यांचे सर्व नवीन अर्ज केवळ महाडीबीटी २.० पोर्टलवरच स्वीकारले जातील.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis