आचार संहितेचे पालन करत सेवा संकल्प अभियानाची अंमलबजावणी करा : जी. श्रीकांत
छत्रपती संभाजीनगर, 23 सप्टेंबर (हिं.स.)। औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने तिचे काटेकोर पालन करत ‘सेवा संकल्प अभियानाची’ मराठवाडा विभागात नियोजनबद्ध व प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त
आचार संहितेचे पालन करत सेवा संकल्प अभियानाची अंमलबजावणी करा : जी. श्रीकांत


छत्रपती संभाजीनगर, 23 सप्टेंबर (हिं.स.)। औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने तिचे काटेकोर पालन करत ‘सेवा संकल्प अभियानाची’ मराठवाडा विभागात नियोजनबद्ध व प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी विभागातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार ६ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख, ७ ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी, ९ ऑक्टोबर रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असून २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होणार आहे. २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार असून, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण होणार आहे. या कालावधीत संबंधित आठही जिल्ह्यांमध्ये आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या.

दरम्यान,आदर्श आचारसंहितेमुळे ‘सेवा संकल्प अभियानातील’ नागरिकाभिमुख व लोककल्याणकारी उपक्रम थांबवू नयेत. मात्र, प्रत्येक उपक्रमाची अंमलबजावणी निवडणूक आयोगाच्या निर्देशांशी सुसंगत आणि कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले. सेवा सेतू शिबिरे, विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ, स्वच्छता व श्रमदान, जनजागृती तसेच ‘सेवा माझे योगदान’ यांसह नियोजित उपक्रमांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

मुख्य सचिवांच्या बैठकीनंतर विभागीय आयुक्तांनी विभागातील सर्व जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या सेवा संकल्प अभियानाचा उद्देश नागरिकांना शासकीय सेवा व योजनांचा थेट लाभ मिळवून देणे हा असून, निवडणूक प्रक्रिया आणि आचारसंहितेचे पालन करत अभियानातील प्रत्येक लोकाभिमुख उपक्रम प्रभावीपणे सुरू ठेवावा, असे निर्देश त्यांनी दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande