
परभणी, 23 सप्टेंबर, (हिं.स.)। विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले यांनी पूर्णा, परभणी आणि गंगाखेड रेल्वे स्थानकांना भेट देऊन ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेअंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांची बुधवारी(दि. २३)पाहणी केली.
यावेळी प्रदीप कामले यांनी स्थानकांवर सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच प्रवाशांसाठी निर्माण करण्यात येत असलेल्या आधुनिक सुविधा आणि पायाभूत सुविधांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून कामांच्या सद्यस्थितीची माहिती घेतली. विकासकामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक नियोजन व समन्वय राखण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
‘अमृत भारत स्टेशन’ योजनेअंतर्गत विकसित करण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये प्रवाशांची सोय, सुलभता, स्वच्छता, सुरक्षितता आणि आधुनिक प्रवासी सुविधा यांना प्राधान्य देण्यावर त्यांनी भर दिला. या पाहणीदरम्यान अभियांत्रिकी, विद्युत, वाणिज्य, परिचालन तसेच इतर संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. संबंधित अधिकाऱ्यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना सुरू असलेल्या कामांची प्रगती तसेच सुरक्षा आणि पायाभूत सुविधांबाबत माहिती दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis