
परभणी, 23 सप्टेंबर (हिं.स.)।
गणेशोत्सवाच्या उत्साहात पूर्णा शहरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याने नागरिकांचा मनस्ताप वाढला आहे. भवानी माता मंदिर ते ३३ केव्ही उपकेंद्रादरम्यानच्या आनंदनगर फिडरवरील वाढता वीजभार यासाठी कारणीभूत ठरत असल्याच्या तक्रारी आहेत. मागील तीन ते चार महिन्यांपासून या फिडरवर ओव्हरलोडची समस्या निर्माण होत असून, डीपी जळणे, वीजवाहिन्या तुटणे, डीओ जाणे आणि वारंवार ब्रेकडाऊन होण्याचे प्रकार सुरू आहेत. विशेषतः मागील पाच दिवसांत ३० ते ४० वेळा वीजपुरवठा खंडित झाल्याचा दावा नागरिकांनी केला असून, प्रत्येक वेळी अर्धा ते दीड तास वीजपुरवठा बंद राहत असल्याचे सांगण्यात येते.
आनंदनगर फिडरच्या कार्यक्षेत्रात शहराची मुख्य बाजारपेठ, नवा मोंढा, जुना मोंढा तसेच मोठ्या वसाहतींचा समावेश आहे. गणेशोत्सवाच्या काळात व्यापारी, घरगुती ग्राहक आणि गणेश मंडळांना वारंवार वीज खंडित होण्याचा फटका बसत आहे. परमिटच्या नावाखाली वारंवार वीजपुरवठा बंद ठेवला जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. भवानी माता मंदिर सबस्टेशनअंतर्गत चार फिडर असून, आनंदनगर फिडरसह कोळीवाडा-७ डीपीच्या माध्यमातून एकूण २९ डीपींना वीजपुरवठा केला जातो. आनंदनगर फिडरवरील भार कमी करण्यासाठी मराठा गल्ली, मस्तानपुरा, गवळी गल्ली आणि अजीज नगरातील काही डीपी शेजारील कोळीवाडा फिडरवर वर्गीकृत केल्यास भाराचे संतुलन साधता येऊ शकते, अशी नागरिकांची मागणी आहे. याबाबत स्थानिक उपकार्यकारी अभियंता पांचाळ व कनिष्ठ अभियंता पाटील यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगितले जाते; मात्र प्रत्यक्ष भारविभाजनाला अपेक्षित गती मिळत नसल्याची तक्रार आहे.
आनंदनगर फिडरवरील वीजबिल वसुलीचे प्रमाण चांगले असल्याचे महावितरणच्या सूत्रांकडून सांगण्यात येते. मात्र, वसुलीबरोबरच फिडरची क्षमता, वाढता भार आणि ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा यांचे नियोजन महत्त्वाचे आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना वारंवार अंधाराचा सामना करावा लागू नये, यासाठी आनंदनगर फिडरवरील भार कमी करणे, आवश्यक डीपींचे फिडर पुनर्वितरण करणे, १५ एबी स्विचचा प्रभावी वापर करणे आणि ब्रेकडाऊनच्या वेळी तातडीने प्रतिसाद देण्यासाठी महावितरणने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis