
अमरावती, 23 सप्टेंबर (हिं.स.)महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच पश्चिम विदर्भातील राजकीय वातावरण तापले आहे. भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान, तर २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. २९ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार असून ६ ऑक्टोबर ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार किरण सरनाईक यांचा कार्यकाळ संपत असल्याने ही निवडणूक त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. सरनाईक यांनी अलीकडेच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला असून, त्यांची पुन्हा उमेदवारी निश्चित होते का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, महायुतीमध्ये या जागेवर भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील दावेदारीचा प्रश्न अद्याप स्पष्ट झालेला नाही. विद्यमान आमदार म्हणून सरनाईक यांच्यासोबतच माजी आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे यांचे नावही चर्चेत आहे.
दुसरीकडे भाजपनेही अमरावती शिक्षक मतदारसंघावर दावा करण्याची तयारी सुरू केल्याची माहिती आहे. संगीता शिंदे, चंद्रशेखर भोयर, सुमित पवार यांच्यासह शिक्षक संघटनांशी संबंधित काही चेहरे इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महायुतीकडून उमेदवारी कोणाला मिळणार, यावरच पुढील राजकीय समीकरणांची दिशा ठरण्याची शक्यता आहे. याच मतदारसंघातील मागील निवडणुकीत किरण सरनाईक यांनी १५ हजार ६०६ मते मिळवत विजय मिळवला होता, तर प्रा. श्रीकांत देशपांडे यांना ९ हजार १९१ मते मिळाली होती.
मविआसमोर एकजुटीचे आव्हान
महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्याकडून संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू होण्याची शक्यता आहे. पाचही जिल्ह्यांत स्वीकारार्ह ठरेल, शिक्षक संघटनांमध्ये प्रभाव निर्माण करू शकेल आणि महायुतीच्या संभाव्य उमेदवारासमोर थेट लढत देऊ शकेल, अशा चेहऱ्याचा शोध आघाडीसमोर आहे. त्यामुळे जागावाटपाबरोबरच उमेदवार निवडीची प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.
अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या मतदारसंघात शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न निवडणुकीच्या केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे. प्रलंबित अनुदान, संचमान्यता, जुनी पेन्शन योजना, शिक्षकांच्या सेवा-संबंधित प्रश्नांसह शिक्षण क्षेत्रातील विविध मागण्यांवरून उमेदवारांकडून भूमिका मांडल्या जाणार आहेत.
याशिवाय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदार याद्यांची अचूकता हाही महत्त्वाचा विषय ठरला आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाने शिक्षक मतदारसंघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे.दरम्यान, मतदार यादीत कथित अपात्र व संशयास्पद नोंदी असल्याचा दावा काही शिक्षक नेत्यांनी यापूर्वी केला होता; या दाव्यांबाबत संबंधित अधिकृत पडताळणीचा मुद्दाही चर्चेत राहिला आहे.
एकूणच, महायुतीतील जागावाटप, भाजप-शिवसेनेतील दावेदारी, मविआची उमेदवार निवड आणि शिक्षक संघटनांची भूमिका या चार बाबींवर अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे चित्र अवलंबून राहणार आहे. आता २९ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यानंतर या राजकीय रणधुमाळीला प्रत्यक्ष वेग येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी