
परभणी, 23 सप्टेंबर (हिं.स.)। सेवा संकल्प अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, जांब येथे विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. किशोर सुरवसे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रावजी सोनवणे यांच्या नियंत्रणाखाली झालेल्या या शिबिरात नागरिकांची विविध आजारांची तपासणी, स्क्रीनिंग आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिरात उच्च रक्तदाबाच्या ७५, मधुमेहाच्या ३२, क्षयरोगासाठी एक्स-रेच्या ६५, संशयित कुष्ठरोगाची १ तसेच ईसीजीच्या ५२ प्राथमिक तपासण्या करण्यात आल्या. यासोबतच डोळ्यांची तपासणी करून नागरिकांना आवश्यक आरोग्य सल्ला देण्यात आला.
यावेळी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, वय वंदना योजना यांसह आरोग्य विभागाच्या विविध योजना व सेवांची माहिती देण्यात आली. तसेच अवयवदान, व्यसनमुक्ती, जन्म-मृत्यू नोंदणी याबाबतही जनजागृती करण्यात आली.
निरोगी जीवनशैली, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि योगाचे महत्त्व याबाबत तज्ज्ञांनी नागरिकांना मार्गदर्शन केले.
आजारांचे लवकर निदान, वेळेवर उपचार आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचे महत्त्वही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. आबासाहेब थोरात व त्यांचा वैद्यकीय स्टाफ उपस्थित होता. प्राथमिक आरोग्य केंद्र, जांबच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शिल्पा कुलकर्णी, डॉ. विद्या रेंगे तसेच आरोग्य केंद्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष योगदान दिले.
शिबिरात एकूण ११२ नागरिकांची आरोग्य तपासणी व स्क्रीनिंग करण्यात आले. “निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करा, नियमित आरोग्य तपासणी करून घ्या आणि निरोगी समाजाच्या निर्मितीत सहभागी व्हा,” असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis