जळगावात सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा
जळगाव , 23 सप्टेंबर (हिं.स.) राज्यभरात हवामानात मोठे बदल पाहायला मिळत आहे. एकीकडे पावसाने दडी मारल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. यातच मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील काही भागांत आज विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असून, अ
जळगावात सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा


जळगाव , 23 सप्टेंबर (हिं.स.) राज्यभरात हवामानात मोठे बदल पाहायला मिळत आहे. एकीकडे पावसाने दडी मारल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. यातच मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील काही भागांत आज विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असून, अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र, जळगाव जिल्ह्याला सध्या कोणताही पावसाचा अलर्ट देण्यात आलेला नसून, उलट तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यातच जळगावकरांना ऑक्टोबर हिटसारख्या उकाड्याचा तडाखा जाणवण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने आज मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. लातूर, धाराशिव, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच कोकणासह कोल्हापूर, सांगली, पुणे, नाशिक, सातारा, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतही विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे.

यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे जळगाव जिल्ह्यात पावसाचा कुठलाही अलर्ट नसून उलट तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात २३ ते २६ सप्टेंबरदरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे. त्याचवेळी ढगांचे आच्छादन कमी झाल्याने जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, सप्टेंबर महिन्यातच नागरिकांना ‘ऑक्टोबर हिट’सारख्या तीव्र उन्हाचा व दमट उकाड्याचा सामना करावा लागत आहे. मान्सूनचा जोर ओसरत असल्याने आणि आर्द्रता वाढल्याने जळगावकरांना आगामी काही दिवस घामाच्या धारा आणि असह्य उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande